सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (२५ ऑगस्ट) : एका भरधाव मिनी बस ने बैलांसह शेतकऱ्याला जोरदार धडक दिली. यात एका शेतकऱ्यासह एक बैल ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान, वणी-मुकुटबन मार्गावर पेटूर गावाजवळ घडली.
देवराव दत्तुजी बोढाले (५५) रा.पेटुर असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मंगळवार दि.२४ ऑगस्ट ला शेतकरी देवराव बोढाले हे नेहमी प्रमाणे शेतावर काम करण्यासाठी शेतात गेले होते. दिवसभर आपली कामे निपटवून सायंकाळी ७ वाजताचे सुमारास बैलांना घेऊन ते घराकडे निघाले होते. अशातच पेटुर गावाजवळ येताच मुकूटबन कडुन सिमेंट कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन वणी मार्गे भरधाव जाणाऱ्या मिनी बस क्र.M H-34 AB-8246 ने देवराव बोढाले व एका बैलाला जोरदार धडक दिली. या अपघातात देवराव बोढाले यांना गंभीर मार लागल्याने त्यांना वणी येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर बैलाला ही गंभीर मार लागल्याने बैलाचा ही मृत्यू झाला.
दरम्यान, आज दि.२५ ऑगस्ट ला ग्रामीण रुग्णालय येथे देवराव बोढाले यांच्या मृत्यूदेहावर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी मृत्यूदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनासह वणी पंचायत समिती सभापतींच्या माध्यस्तीने तणाव शांत करण्यात आला. या प्रकरणी मिनी बस चालकाच्या विरुद्ध २७९,३०४, (अ), ४२९, भादंवी सह कलम १३४(A) (B) मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास जमादार ईरपाते करीत आहे.