सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१६ जुलै) : गोवंश जनावरांना कत्तली करिता घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाला डीबी पथकाने ताब्यात घेऊन जनावरांची खाटकाच्या तावडीतून मुक्तता केली आहे. छोटा हाती या मालवाहू वाहनातून गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचून मोमीनपुरा येथे कत्तली करिता घेऊन जाणाऱ्या गोवंश जनावरांना खाटकाच्या तावडीतून मुक्त केले आहे. ही कार्यवाही १६ जुलैच्या रात्री उशिरा करण्यात आली.डीबी पथकाची शहरात गस्त सुरु असतांना त्यांना गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. माहिती मिळताच डीबी पथकाने तलाव रोड येथे सापळा रचून मालवाहू वाहनांची तपासणी सुरु केली. दरम्यान छोटा हाती हे मालवाहू वाहन भरधाव येतांना दिसले. डीबी पथकाने या वाहनाला थांबवून वाहनांची झडती घेतली असता वाहनात २ गोवंश जनावरे व एक म्हैस असे एकूण ३ जनावरे अतिशय निर्दयीपणे कोंबून असल्याचे आढळून आले. वाहन चालकाला जनावराच्या वाहतुकीबाबत विचारले असता त्याने खडबडा मोहल्ला येथून मोमीनपुरा येथे कत्तली करिता जनावरे घेऊन जात असल्याचे सांगितले. वाहन चालकाकडून पोलिसांनी कत्तली करिता जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्यांची नावे जाणून घेत घडबडा मोहल्ला येथे धाड टाकली. त्याठिकाणी पोलिसांना कत्तली करिता निर्दयीपणे दोराने बांधून ठेवलेली १२ जनावरे आढळली. चारापाण्याची व्यवस्था न करता दोराने या जनावरांना बांधून ठेवण्यात आले होते. या जनावरांची कत्तली करिता विक्री केली जाणार होती. पोलिसांनी तत्परता दाखवून वेळीच त्यांचा डाव उधळून लावल्याने १५ जनावरांचा जीव वाचला. पोलिसांनी या धाडीत १४ गोवंश जनावरे व एक म्हैस किंमत १ लाख १५ हजार रुपये व MH २९ BE १४२७ हे मालवाहू वाहन किंमत १ लाख ८० हजार असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी एयताज खान इस्माईल खान (२३), सय्यद रहेमान सय्यद कादर (४५), शेख वकील शेख रसूल (५०) सर्व रा. खडबडा मोहल्ला, एजाज कुरेशी, मो. एस्तेयाक अब्दुल वहाब कुरेशी रा. रजा नगर या पाच आरोपींना अटक केली. त्यांच्यावर प्राण्यांचा छळ अधिनियम १९६० व मोटार वाहन कायद्याच्या कलम १३०(३)/१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पोलिस निरीक्षक वैभव जाधव डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, पोउपनि आशिष झिमटे, डीबी पथकाचे सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, मुकेश करपते, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, संजय शेंद्रे, मिथुन राऊत, यांनी केली. पुढील तपास सपोनि संदिप एकाटे करित आहे.
कत्तली करिता जाणाऱ्या १५ जनावरांची डीबी पथकाने केली सुटका
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 16, 2021
Rating:
