सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.७) : वणी यवतमाळ व वणी वरोरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवरून उडान पूल बांधण्यात येणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांआधी चांगलेच उधाण आले होते. उडाणपूल बांधण्याकरिता जोरदार प्रयत्न सुरु असल्याचीही चर्चा सुरु होती. उडाणपुलाची आवश्यक्ता लक्षात घेता, शासनाची मंजुरी मिळविण्याकरिता लोकप्रतिनिधींच्या हालचालीही सुरु असल्याचे सांगण्यात आले. उडाणपुलाच्या बांधकामाचा मुहूर्त काढण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावाही करण्यात येत असल्याच्या चर्चा चघळल्या जात होत्या. पण रेल्वे क्रॉसिंग वरील उडाणपुलाचा प्रश्न अद्यापही अधांतरीच असून प्रयत्न कुठे अपुरे पडले आहे, हे कळायला आता मार्ग उरला नाही. आता तर उडाणपुल बांधण्याच्या चर्च्याही कमी झाल्या असून उडाणपुलाचा विषयच बाजूला ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. रेल्वे क्रॉसिंगवर वाहतुकीची होत असलेली कोंडी नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत असून क्रॉसिंग वरून रेल्वे निघत पर्यंत नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. गेटमनला रेल्वे येणार असल्याची सूचना मिळाल्यापासून तर रेल्वे क्रॉसिंगवरून रेल्वे पास होईपर्यंत अर्धा तास गेट बंद रहात असल्याने विनाकारण नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. मालवाहतूक, प्रवासी बस, स्कुल बस, रुग्ण वाहिका यांना रेल्वे गेट बंदचा चांगलाच फटका बसत असून त्यांना आपापल्या ठिकाणी पोहचण्यास विनाकारण विलंब होत आहे. नोकरीवर जाणाऱ्यांनाही गेट बंद मिळाल्यास उशीर होत असल्याने त्यांना वरिष्ठांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे. रेल्वे क्रॉसिंगवर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची लांबच लांब रांग लागत असल्याने गेट खुलल्यानंतरही बराच वेळ रेल्वे क्रॉसिंगवर वाहनांचा जॅम लागलेला असतो. रेल्वे गेट खुलताच उतावीळ झालेले वाहन धारक जागा मिळेल तेथून वाहने घुसविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रेल्वे क्रॉसिंगच्या मधोमध वाहनाचा जॅम लागतो. वाहन धारकांना रेल्वे क्रॉसिंग पार करण्यास कधी कधी अर्धा ते एक तासांपर्यंतचाही वेळ लागत असल्याने त्यांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.वणी वरून यवतमाळ व वरोरा जाणाऱ्या मार्गावर रेल्वे क्रॉसिंग असल्याने या मार्गावर नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतांना दिसतो. लांब पल्ल्याच्या प्रवासी व मालवाहू रेल्वे गाड्या वणी मार्गाने धावतात. या मार्गाने मालवाहू गाड्यांची वाहतूक वाढल्याने सतत रेल्वे गेट बंद राहते. त्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर वाहतुकीची नेहमी कोंडी होतांना दिसते. चंद्रपूर वणी या दुपदरी सिमेंट रोडचे काम सुरु असतांना वणी वरोरा रोडवरील रेल्वे क्रॉसिंग वरून उडाणपूल बांधण्यात येणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली. आता तर वणी वरोरा रोडचे चौपदरीकरणी होत आहे. त्यामुळे उडाणपुल होणं अपेक्षित होतं. तसेच वणी यवतमाळ रोडवरील रेल्वे क्रॉसिंगवरूनही उडाणपुलाचं बांधकाम करण्यात येणार असल्याचीही चर्चा होती. पण आद्यपही उडाणपुलाचा प्रश्न अधांतरीच आहे. उडाणपूलाचं बांधकाम सुरु होण्याची आणखी किती दिवस नागरिकांना वाट पाहावी लागणार, कोण जाणे. कित्येक दिवसांपासून रेल्वे गेट बंदचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे गेट बंद झाला की, अर्धा अर्धा तास ताटकळत उभं राहावं लागतं. यामुळे विनाकारण नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. वाहन धारक ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहचू शकत नसल्याने त्यांना नुकसान सहन करावं लागत आहे. कित्येक दिवसांपासून उडाणपुलाची मागणी असतांना देखील याकडे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाहीत. रेल्वे गेट बंद रहात असल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे मार्गावर रास्ता रोको आंदोलनासारखी परिस्थिती निर्माण होते. रेल्वे क्रॉसिंग जवळ वाहनांची जत्रा पाहायला मिळते. ही परिस्थिती कधी तरी बदलेल काय, याकडे आता नागरिकांच्या नजरा लागल्या आहे. नागरिकांचं उडाणपुलाचं स्वप्न साकार होईल की, नाही हा आता चिंतनाचा विषय बनला आहे.
वणी : रेल्वे क्रॉसिंग वरून उडाणपूल बनण्याच्या आशा आता होऊ लागल्या धूसर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 07, 2021
Rating:
