सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : श्री भगवंताच्या जवळ पोहोचण्याचा सगळ्यात सुंदर मार्ग म्हणजे संगीत. मनाला प्रफुल्लित करीत भक्तीगीतांच्या माध्यमातून भगवंताशी नाळ जोडण्याच्या त्याच्या शक्तीचा विचार करीत नागपूर येथील सोहम् कलाविष्कार या कलाकारांच्या समूहाच्या माध्यमातून स्थानिक जैताई मंदिरात सुरू असणाऱ्या शारदीय नवरात्राच्या पाचव्या दिवशी स्वरधारा या संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
वाजे मृदंग टाळ वीणा.. या गीताने श्री गणेश वंदना करीत सुरू झालेल्या या कार्यक्रमात नागपूर येथील सुप्रसिद्ध गायक अमर कुलकर्णी आणि गायिका मंजिरी वैद्य अय्यर यांनी एकाहून एक सुंदर गीत शृंखला सादर केली.
अंबे चरण कमल है तेरे ! अपार हा भवसागर दुस्तर !
चदरिया झिनी रे झिनी ! माझी रेणुका माऊली !
निघालो घेऊन दत्ताची पालखी ! राम भजन कर मन !
अशा विविध लोकप्रिय गीतांना सादर केल्यानंतर नागपुरातीलच एका अनाम कवीचे अजिंक्य श्रौती यांनी संगीतबद्ध केलेले भजनी राम वचनी राम स्तवनी राम गावा रे ! या अमर कुलकर्णी यांनी सादर केलेल्या गीताने श्रोत्यांना विशेष आनंद प्रदान केला.
यानंतर देवस्थानच्या वतीने सौ प्रणिता पुंड, हरिहर भागवत, अशोक सोनटक्के, तुषार नगरवाला, जयंत लिडबिडे यांच्या हस्ते गायक आणि वादक यांचा सन्मान करण्यात आला.
उत्तरार्धामध्ये पांडुरंग कांती ! कानडा राजा पंढरीचा ! या अमर कुलकर्णी यांच्या सुरेल सादरीकरणानंतर मंजिरी वैद्य यांनी अनादि निर्गुण हा जोगवा अमर कुलकर्णी यांनी सत्वर पावगे मला हा रोडगा प्रस्तुत करीत जगदंब गीतांचे सादरीकरण केले. स्थानिक कलाकार ऐश्वर्या अलोणे यांनी अमृताहुनी गोड हा अभंग सादर केला.
संयोजक आणि सूत्रसंचालक गजानन रानडे यांनी त्यांच्या या समूहाद्वारे गीतरामायणाच्या शंभर कार्यक्रमांच्या संकल्पचा १७५ स्वरूपात कसा विस्तार झाला ते सांगून भावी काळात वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्षाच्या निमित्ताने संस्कार भारतीय द्वारे वंद्य वंदे मातरम् या कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी माहिती दिली.
त्यानंतर आदिमाया अंबाबाई हा गोंधळ आई भवानी तुझ्या कृपेने आणि नदीच्या पल्याड यांचे सलग सादरीकरण पंकिडा आणि भक्तोंको दर्शन दे गई रे ! अशा गरबा गीतांचे देखील प्रस्तुतीकरण केले गेले.
समाजासमोर अशा स्वरूपातील उत्सवांमध्ये आपण एक चिंतन ठेवायला हवे. उत्सव हा केवळ मनोरंजनाचा विषय न होता त्यातून समाज प्रबोधन व्हायला हवे असे म्हणत सध्याच्या समाजातील अनेक वाईट गोष्टींचा उल्लेख करीत यातून बाहेर पडण्याची प्रेरणा आपल्याला जैताई मातेने द्यावी असे अंतर्मुख करणारे मनोगत अमर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सागरसूक्त नावाने सुप्रसिद्ध असणाऱ्या ने मजसी ने परत मातृभूमीला या गाण्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमात अमर कुलकर्णी आणि मंजिरी वैद्य अय्यर या गीतकारांना अथर्व शेष यांनी तबल्यावर तर आर्य पुराणकर यांनी कीबोर्डवर साथसंगत केली. संस्कार भारतीचे स्थानिक कार्यकर्ते तथा जैताई सेवक सागर मुने यांनी सहताल वाद्यांची संगती केली.
कार्यक्रमाला वणीकर जनतेने मोठ्या संख्येत उस्फूर्त प्रतिसाद दिला हे विशेष उल्लेखनीय.