सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांचा वाढता सहभाग आणि पक्षप्रवेशामुळे मारेगाव तालुक्यात राजकीय चर्चा जोर धरत आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात महिलांनी (दि. 17) पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यात भाजपची ताकद वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मारेगाव येथील बदकी भवनात झालेल्या महिला पक्षप्रवेशामुळे भाजपच्या स्थानिक संघटनात्मक बांधणीला बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षाचे नेतृत्व, कार्यपद्धती आणि स्थानिक पातळीवरील संपर्क यामुळे महिलांचा भाजपकडे ओढा वाढत असल्याचे या घडामोडीतून दिसून येते.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या यशानंतर तालुक्यातील राजकीय वातावरणातही त्याचे पडसाद उमटत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महिलांचा भाजपमधील प्रवेश हा पक्षासाठी संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
राजकारणात महिलांचा वाढता सहभाग हा पक्षसंघटनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. महिलांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवर भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्यास मदत होऊ शकते. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे मार्गदर्शन आणि अविनाश लांबट यांचे तालुक्यातील नेतृत्व आगामी काळात पक्षाला कितपत बळकटी देणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे सहकार क्षेत्रातील निवडणुकीनंतरचे राजकीय समीकरण, तर दुसरीकडे महिलांचा पक्षप्रवेश, या घडामोडींमुळे मारेगाव तालुक्यात भाजपच्या राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे.


