टॉप बातम्या

मारेगावात महावितरणच्या आढावा बैठकीत वीज प्रश्नांवर खडाजंगी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या वीजविषयक समस्यांचा आढावा घेण्यासाठी मारेगाव येथे महावितरणची बैठक घेण्यात आली. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सोलर कृषी पंप, जुने डिमांड, स्मार्ट मीटर, प्रलंबित वीज जोडण्या तसेच कृषी व घरगुती वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी केलेल्या अर्जांनंतर पंप मिळण्यास होत असलेल्या विलंबाचा मुद्दा उपस्थित केला. निर्धारित कालावधीत पंप उपलब्ध न झाल्यास संबंधित एजन्सीवर दंडात्मक कारवाईची तरतूद असताना, आतापर्यंत किती एजन्सींवर कारवाई करण्यात आली, अशी विचारणा आमदार देरकर यांनी अधिकाऱ्यांकडे केली. यावर अद्याप कोणत्याही एजन्सीवर अशी कारवाई झालेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कृषी पंपासाठी पूर्वी भरलेल्या जुन्या डिमांडची रक्कम परत मिळावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. तसेच स्मार्ट मीटरबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित करत महावितरणकडे इतर पर्यायी मीटर उपलब्ध नसल्याने स्मार्ट मीटर बसविण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार संजय देरकर यांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेऊन प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. मोठ्या स्वरूपाच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासह झालेल्या कार्यवाहीचा पुढील महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता संजया खंगार, उपअभियंता संतोष लोहे, कनिष्ठ अभियंता निलेश काकडे, ज्युही वाघमारे, सहाय्यक अभियंता अतुल आत्राम यांच्यासह नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की, माजी जि.प.सदस्य अनिल दरेकर, तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, शहर प्रमुख अभय चौधरी, संपर्कप्रमुख सचिन पचारे, देवा बोबडे तसेच महावितरणचे अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();