टॉप बातम्या

वसुंधरा पायी दिंडी नाणीजधामकडे मार्गस्थ

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

यवतमाळ : दि. २४ सप्टेंबर : पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी २०२६’ श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने आयोजित या दिंडीचे ११ सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र मोहगाव झिल्पी, ता. हिंगणा, जि. नागपूर येथून प्रस्थान झाले असून हजारो वारकरी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहेत.

दि. १७ सप्टेंबर रोजी दिंडीचे यवतमाळ जिल्ह्यातील खिनी येथे आगमन झाले. यावेळी स्काय इंटरनॅशनल स्कूल तसेच श्रीमती कमलाबाई यादवरा‌व डांगे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. श्री. राजेंद्र डांगे, श्री. यशवंत डांगे आणि प्राचार्य डॉ. नितीन सिंघवी यांच्या उपस्थितीत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

दिंडीच्या माध्यमातून वृक्षारोपणासोबत वृक्षांचे संगोपन, स्वच्छता, जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जनजागृती केली जात आहे. मार्गावर स्वच्छता पथक कार्यरत असून हजारो वारकऱ्यांसाठी पाणी, निवास, भोजन, स्वच्छतागृहे आदींची पर्यावरणपूरक व्यवस्था करण्यात आली आहे. दोन पाण्याचे टँकरही दिंडीसोबत आहेत.

वारकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत QR कोड व संकेतस्थळीय प्रणालीद्वारे दिवसातून पाच वेळा उपस्थिती नोंदविली जात आहे. वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून वारकरी रस्त्याच्या एका बाजूने शिस्तबद्धपणे मार्गक्रमण करीत आहेत.

अध्यात्मासोबत मानवसेवेचा संदेश देताना रक्तदान, देहदान, अवयवदान, शिक्षण, आरोग्य आणि शेतकरी सक्षमीकरणासारखे विविध सेवा उपक्रमही राबविले जात आहेत. गरजू रुग्णांसाठी रक्तदात्यांशी संपर्क साधण्यास मदत करणाऱ्या ‘ब्लड इन नीड’ या अनुप्रयोगाचाही वापर करण्यात येत आहे.

‘वसुंधरा पायी दिंडी’चे हे सलग चौथे वर्ष असून महाराष्ट्रातील विविध भागांसह तेलंगणा व गोव्यातूनही दिंड्या नाणीजधामकडे मार्गस्थ झाल्या आहेत. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा ६०वा वाढदिवस २१ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे साजरा होणार असून यावेळी दिंड्यांचा समारोप होणार आहे.

“वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि भावी पिढीसाठी हिरवेगार भविष्य घडवा,” हा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चा प्रवास सुरू आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();