टॉप बातम्या

कार्यकर्त्यांच्या वेदना पुन्हा उफाळल्या; निष्ठावंत शिवसैनिक बाहेर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शिवसेनेचे निष्ठावंत व अनुभवी नेतृत्व म्हणून ओळख असलेले राजू तुरणकर यांनी शहर संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने वणीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी माजी विद्यार्थी तालुका प्रमुख, नगरसेवक, शहर प्रमुख तसेच शहर संपर्क प्रमुख अशी विविध जबाबदारीची पदे प्रामाणिकपणे सांभाळली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेसाठी आपले आयुष्य वाहिले असून, सामाजिक कार्यातूनही त्यांनी शहरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शिवसेनेच्या “८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण” या ध्येयधोरणानुसार पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आंदोलने, जेलवारी, संघर्ष यांतून त्यांनी पक्षासाठी काम केले; मात्र कधीही कोणतीही वैयक्तिक अपेक्षा ठेवली नाही. २०२५ च्या वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक २ मधून निवडणूक लढविली, परंतु शहरातील संघटनात्मक अपयश, प्रभावी प्रचाराचा अभाव व नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे पक्षाला पराभव स्वीकारावा लागल्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आहे.

निवडणुकीनंतर झालेल्या कार्यक्रमांमध्ये शहर संपर्क प्रमुख व शहर संघटक यांचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळण्यात आल्याची भावना निर्माण झाली. यापूर्वीही अशा प्रकारांकडे दुर्लक्ष झाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अवमान होत असल्याची तीव्र खंत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही वाद न वाढवता, मानसिक त्रास सहन करत राजू तुरणकर यांनी शहर संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने वणीतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();