सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : सततच्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे वणी तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांचे पीक हातात येण्याआधीच नष्ट होत असल्याने ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. महायुती सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांचे मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली वणी तहसील कार्यालयावर डफडे वाजवत आंदोलन करण्यात आले.
या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार मागणी केली, “जिल्ह्यासह वणी उपविभागीय क्षेत्रात जोरदार झालेल्या अतिवृष्टीने मोठं नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे होत्याचं नव्हते झाले. अतिवृष्टी ने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवीला. सरसकट मदत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. शेतकरी जगला तरच देश वाचेल. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत जाहीर करावी,जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही लावून धरली.”
डफडे आंदोलनात जिल्हा पदाधिकारी, तालुका व शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी महायुती सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.