सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : काँग्रेसचे संजय खाडे व त्यांच्या सह सात सहका-यांचे करण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यांना पुन्हा एकदा पक्षाने काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. संजय खाडे व त्यांच्या सहका-यांचे निलंबन रद्द करण्याबाबत खा. प्रतिभा धानोरकर यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे निलंबन रद्द करण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरून प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने या आठ नेत्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस (प्रशासन व संघटन) यांनी अधिकृत पत्र काढून निलंबन रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचा पारंपरिक गड असलेला वणी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उबाठाच्या वाटेला गेला होता. त्यामुळे संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्या निवडणुकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे यांच्यासह पुरुषोत्तम आवारी, पलाश तेजराज बोढे, वंदना आवारी, प्रमोद वासेकर, शंकर व-हाटे व प्रशांत गोहोकार यांनी सहकार्य करत असल्याचा ठपका ठेवत या सर्वांवर पक्षाद्वारे निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती.
संजय खाडे यांच्यासह आठ ही नेत्यांचे काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील जडणघडणीत मोठा वाटा राहिला आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्ष वाढवण्यास हे सर्व नेते कायमच अग्रस्थानी राहिले. या सर्व नेत्यांचा पूर्वइतिहास व कार्य पाहता पक्षाने त्यांचे निलंबन रद्द करून काँग्रेस मध्ये काम करण्याची संधी दिली आहे. निलंबन रद्द झाल्याने संजय खाडे समर्थक व काँग्रेसमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
संजय खाडे यांचे निलंबन मागे, काँग्रेस पक्षाने दिली पुन्हा काम करण्याची संधी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 21, 2025
Rating: