सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : एखाद्या माणसाच्या नावात काय जादू असते, नावाला काय वलय असते याचा मला अलीकडे फार मोठ्ठा अनुभव आला. निमित्त होते राज्य हौशी नाट्य स्पर्धेचे. चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून हौसी नाट्यस्पर्धेचे यावर्षी १८ नाट्यप्रयोग सादर झालेत. आम्ही सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला.
बुधवार दिनांक ११ डिसेंबर ला आमचे "अस्सा नवरा नको गं बाई!" हे नाटक होणार होते. एरवी चंद्रपूर चे रसिक प्रेक्षक प्रचंड चोखंदळ आहेत हे ऐकले होते. नाटक बेकार वाटले तर नाट्यगृहाच्या खुर्च्या कधी रिकाम्या होतील याचा नेम नसतो अशी चंद्रपूरची ख्याती. तिथे आमचं नाटकं होणार म्हणजे टेन्शनच तसे आम्ही उशिरा पोहोचलो त्यामुळे पडदा उघडण्याच्या वेळेपर्यंत आमची खूप धावपळ झाली. तितक्यातच या नाटकाचे सिद्धहस्त लेखक सदानंद बोरकर सर रंगमंचावर आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी मुद्दाम आलेत. आमची घाबरलेली अवस्था त्यांनी अचूक हेरली. "अरे नाटक बिनधास्त करा. घाबरु नका. प्रेक्षक तुमच्या सोबत आहेत. नाटक मस्त होईल." असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.आणि हिरमुसलेल्या आमच्यात मोठे बळ संचारले.
सदानंद बोरकर हे विदर्भात नाट्य क्षेत्रातील दिग्गज नाव. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरचे हजारो नाट्य प्रयोग करून रंगमंच गाजविणारा आणि प्रेक्षकांची अचूक नाडी ओळखणारा हा अवलिया कलाकार. एकाच वेळी अनेक भूमिका जगणारा, पार पाडणारा हा रंगकर्मी. लेखन, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शन, अभिनय, मंच व्यवस्थापनासहित निर्मितीच्या अनेक गोष्टी हा रंग तपस्वी लीलया पार पडतो. आणि पूर्णपणे यशस्वी करूनही दाखवीतो.
झाडीपट्टी रंगभूमी मध्ये सदानंद सर यांची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख आहे.
काही वर्षांपूर्वी यमराजच्या दारावर थाप देऊन परत आल्यानंतर विश्रांतीच्या काळात एका सत्य घटनेवर सदानंद सर यांनी *"असा नवरा नकॊ ग बाई !" हे नाटक लिहायला घेतले आणि केवळ तीन महिन्यात एक सर्वांसुंदर कथा जन्माला आली. दिग्दर्शक म्हणून सरांनी यात स्वतःला झोकून दिले. पात्रांचे पोशाख कसे असावे, नेपथ्य कसे असावे, प्रकाश योजना,नेपथ्य आणि वेशभूषेशा यांची रंगसंगती यांची रचना आपल्या कलात्मक नजरेतून जन्माला घातली. अप्रतिम पार्श्व संगीत, नटांचा वास्तववादी अभिनय, संवादफेक या अत्यंत बारीक सारीक बाबींवर बोरकर सर यांनी सूक्ष्म अभ्यास केला आणि नाटक प्रत्यक्ष रंगभूमीवर आणले एवढेच नाही तर महाराष्ट्रात सदर नाटक सुपरहिट करून दाखविले. आमच्या नशिबात हे नाटकं प्रत्यक्ष बघण्याचा योग आला. आणि सरांचे हे नाटक मी सुद्धा आपच्या ग्रुपसोबत करायचे ठरविले. आणि जुळवाजुळव सुरु केली.
या नाटकाबाबत आमच्या सोबत दोन इतिहास घडले. एक म्हणजे सरांनी आजपर्यंत ही नाट्य संहिता कुणालाच दिली नाही, स्वतःच शेकडो प्रयोग केलेत. आणि अशी संहिता आमच्यावर विश्वास टाकून फक्त आम्हाला दिली.
दुसरा इतिहास ११ डिसेंबर ला घडला.
सदानंद बोरकर या नावात काय जादू आहे हे आम्ही त्या दिवशी चंद्रपूरच्या प्रियदर्शनी नाट्यगृहात अनुभवले. चंद्रपूरात आमचं कोणतंही वलयं नाही. आम्ही कोणताही गाजावाजा न करता नाटक केले. फार फार चार-पाचशे प्रेक्षक येतील असा अंदाज होता. पण सदानंद बोरकर यांचे नाटक आहे हे माहीत झाल्यावर नाट्यगृह अर्धा तास पूर्वीच हाऊसफुल्ल झाले. प्रेक्षक नाट्यगृहात खुर्च्या फुल्ल झाल्यानंतर पायऱ्यांवर, दारापाशी उभे राहून तीन तास नाटक बघत होते. आस्वाद घेतं होते, प्रचंड रिस्पॉन्स देत होते. बाहेर गर्दी आवरता आवरेना. शेवटी आयोजकांनी मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप लावले. आणि नाईलाजाने शेकडो प्रेक्षक परत गेले. याला म्हणतात लेखकाच्याच्या नावातील जादू....! केवळ एका रंगकर्मीच्या नावावर हजारो प्रेक्षक गोळा होण्याचा आणि प्रयोग हाउसफुल्ल होण्याचा अनुभव आम्ही सर्व कलावंतांनी पहिल्यांदाच अनुभवला होता.
आम्ही नवखे रंगकर्मी असूनही दमदार संहितेमूळे प्रयोग यशस्वी ठरला. प्रेक्षक पोट धरून हसत होते, टाळ्या वाजवत होते, प्रसंगी इमोशनल होतं होते त्यावेळी आम्ही शहारून गेलो. सदानंद बोरकर सारखे नाटककार यांची रसिक मनावर काय जादू आहे हे त्या दिवशी आम्ही अनुभवले. आम्ही सर्व कलावंत अक्षरशः भारावून गेलो. निशब्द झालोत.
तुमच्या कर्तुत्वाला सलाम सर
तुमच्या हातून नटेश्वराची अशीच सेवा घडत राहो. रंगमंच बहरत राहो....हीच प्रार्थना.
ॲड. मेहमूद पठाण
मारेगावं (वणी)
9423266827
नाट्यानुभूती - महेमूद खान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 16, 2024
Rating: