विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी "गॅस सिलेंडर" या चिन्हावर निवडणूक लढवणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने ‘गॅस सिलिंडर’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार ‘गॅस सिलिंडर’ याच निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवतील. परिणामी मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचवणे आणि एकीकृत प्रचार करणे वंचित बहुजन आघाडीला सोपे जाणार आहे.

प्रकाश आंबेडकरांनी भारिप-बहुजन महासंघाचे विलिनीकरण करून सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती. वंचित बहुजन आघाडीने 2019 च्या महाराष्ट्र विधासभेच्या निवडणुकीबरोबरच लोकसभा निवडणूकही लढवली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीलाही वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे सामोरे गेली आहे. या तिन्ही निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नसला तरी महाराष्ट्रातील वंचित-बहुजनांची एक मोठी व्होट बँक उभारण्यात वंचित बहुजन आघाडीला यश आले आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील 47 जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत वंचितला 37 लाख 46 हजार 200 मते मिळाली होती. मिळालेल्या मतांचे हे प्रमाण एकूण मतदानाच्या 6.92 टक्के एवढे आहे.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 288 पैकी 243 जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत वंचितला 25 लाख 23 हजार 583 मते मिळाली होती. मतदानाचे हे प्रमाण एकूण मतदानाच्या 4.6 टक्के होती. 10 विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही वंचितने 48 पैकी 38 मतदारसंघात उमेदवार उभे केले. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला 15 लाख 82 हजार 855 मते म्हणजेच एकूण मतदानाच्या 2.77 टक्के मते मिळाली.

आजपर्यंत वंचित बहुजन आघाडीला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळे निवडणूक चिन्ह दिले जात होते. सामाईक निवडणूक चिन्ह नसल्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील वेगवेगळे निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे अडचणीचे ठरत होते.

परंतु निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला राज्यातील सर्व 288 मतदारसंघासाठी ‘गॅस सिलिंडर’ हे सामाईक निवडणूक चिन्ह दिल्यामुळे वंचितला मोठे बळ मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यपातळीवर मतदारांच्या घराघरात गॅस सिलिंडर हे निवडणूक चिन्ह पोहोचवणे सोयीचे जाणार असल्यामुळे त्याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यात होण्याची शक्यता आहे.

बाबासाहेबांचे होते स्वप्न
देशातील दलित-वंचितांचा नोंदणीकृत राजकीय पक्ष असावा आणि त्या नोंदणीकृत राजकीय पक्षाला सामाईक निवडणूक चिन्ह मिळालेले असावे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. आतापर्यंत महाराष्ट्रातील एकाही दलित नेत्याला बाबासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करता आलेले नाही. वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस सिलिंडर’ हे सामाईक निवडणूक चिन्ह मिळवून प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या स्वप्नाची एकप्रकारे पूर्तता केल्याची भावना वंचित-बहुजनातून व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी "गॅस सिलेंडर" या चिन्हावर निवडणूक लढवणार विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी "गॅस सिलेंडर" या चिन्हावर निवडणूक लढवणार Reviewed by सह्याद्री चौफेर on August 19, 2024 Rating: 5
Powered by Blogger.