सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020अंतर्गत डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू केला आहे. उत्कृष्ट शिक्षणाची नवी हमी देणारा MSBTE चा नवा अभ्यासक्रमास 'K Scheme' असे संबोधण्यात आले आहे.
K Scheme डिप्लोमा कोर्स अंतर्गत एकूण 49 अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तीन भाषेतून शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी खालीलपैकी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट..
K Scheme च्या नव्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये...
1. MSBTE च्या K Scheme अभ्यासक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा कोर्स मातृभाषेतही करता येतो. विद्यार्थ्यांना यापुढे इंग्रजीसोबत मराठी आणि हिंदी भाषेत शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य मराठी आणि हिंदी भाषेत उपलब्ध केले जाणार आहे. मराठी- इंग्रजी, हिंदी- इंग्रजी अशा द्विभाषेत विद्यार्थ्याना परीक्षा देता येणार आहे.
2. K Scheme मध्ये भारतीय ज्ञानप्रणालींचा म्हणजेच Indian Knowledge System चा अंतर्भाव करण्यात आला आहे.
3. Multiple Entry & Multiple Exit हे K Scheme च्या अभ्यासक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण अपूर्ण राहणार नाही. विद्यार्थ्याच्या प्रत्येक वर्षाच्या शिक्षणाचे महत्त्व कायम ठेवून त्याला शिक्षण कोणत्याही वर्षाला थांबवण्याची आणि पुन्हा सुरू करण्याची परवानगी असणार आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. एखादा विद्यार्थी पदविका शिक्षण अर्धवट सोडून गेल्यास तो पुन्हा परत येऊन अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार आहे. यालाच Multiple Entry असे म्हणण्यात येईल. ही तरतूद विद्यार्थ्याचे अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी नवसंजीवनी ठरणार आहे.
4. तंत्रशिक्षणात औद्योगिक प्रशिक्षण हा अत्यावश्यक असा महत्त्वाचा घटक आहे. MSBTE ने K Scheme च्या अभ्यासक्रमात औद्यागिक प्रशिक्षणाचा कालावधी 6 आठवड्यांवरून 12 आठवडे केला आहे.
5. Academic Bank of Credits System च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्राचे क्रेडिट मिळणार आहेत.
6. स्वयं अध्ययनाचा विचार करून Self Learning Assessment ची तरतूद करण्यात आली आहे.
7. K Scheme च्या अभ्यासक्रमात बदलत्या जीवनशैलीचा विचार करून विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य जपण्यासाठी योगासन आणि मेडिटेशनचा नियमित सराव अनिवार्य करण्यात आला आहे.
8. अभ्यासक्रमात लोकशाहीची मुल्ये रुजवण्यासाठी भारतीय संविधानावर आधारित 'Essence of Indian Constitution' या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.
9. पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक साक्षरता या बाबींचा देखील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.