सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
जिल्ह्यात छुप्या मार्गाने अमली पदार्थाची तस्करी सुरू आहे. परिणामी शाळकरी मुलेही नशेच्या आहारी गेले आहे. याबाबतचे गांभिर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी अमली पदार्थ विक्री करणा-या विरूध्द कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यावरून अवैध धंदे करणा-यांचा पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध घेत असतांना पाटण-बोरी येथे एका व्यक्तीच्या घरी गांजा साठवून असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळताच त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. आणि राजपत्रीत अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंच, मापारी, फोटाग्राफर आणि स्थानिक पोलीसांना सोबत घेत पाटणबोरी येथे जावून शिवाजी चौक भागात राहणा-या गंगाधर नारायण पत्रीवार ४३ याच्या घरी छापा टाकला असता घरातील एका खोलीत पांढ-या रंगाच्या गोणीत हिरवट, काळपट गांजा ज्यात पाने, फुले, देठ आदी वनस्पती असलेला एकूण पाच किलो दोनशे ७१ ग्रॅम वजनाचा ६३ हजार पाचशे ७६ रूपयांचा गांजा मिळून आला. सदर घटनास्थळी पंचनामा करून पांढरकवडा पोलीसांत गंगाधर पत्रीवार रा. पाटण-बोरी याचे विरूध्द गुन्हा दाखल करून त्याला पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली आधारसिंग सोनोने पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, दिनेश झांबरे ठाणेदार पांढरकवडा, व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक रामेश्वर कांडुरे, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदूरकर, रजनिकांत मडावी, नरेश राउत, व पो.स्टे पांढरकवडा येथील किशोर आडे, छंदक मनवर, तुकाराम जंगवाड आदींनी केली आहे.