माधव सरपटवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मागील ६१ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात सक्रिय असलेले मार्गदर्शक माधव गंगाधरराव सरपटवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त येथील जैताई मंदिरात सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, ह भ प मनू महाराज, मनसे चे नेते राजुभाऊ उंबरकर, नगर परिषदेचे माजी अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, विजय चोरडिया रंगनाथ अर्बन निधीचे अध्यक्ष संजय खाडे प्रामुख्याने उपस्थित होते. 
    
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार यांनी माधवराव सरपटवार यांच्या सन १९६२ पासून सुरू केलेल्या सार्वजनिक जीवनावर प्रकाश टाकला.

सर्व प्रथम आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व उपस्थित अतिथींच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनतर जैताई देवस्थान समिती, गजानन महाराज उपासक मंडळ, मित्र मंडळ, प्रेस वेलफेअर असोसिएशन, अन्न छत्र समिती, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ या संस्थेसोबत माधवराव सरपटवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. 
      
सत्काराला उत्तर देतांना माधवराव सरपटवार यांनी उपस्थितांचे मनापासून आभार मानून सार्वजनिक जीवनात आलेल्या कडू-गोड प्रसंगाचा उल्लेख करून जीवनात संकटे ही येतातच पण त्यामुळे खचून न जाता त्यांच्याशी सामना करा असा संदेश दिला. अध्यक्षीय भाषण करतांना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी माधवराव यांनी आदर्श विद्यालयात एक आदर्श शिक्षक म्हणून मोलाचे काम केले आहे. पण त्यासोबत सार्वजनिक क्षेत्रात काम करीत असतात पत्रकारितेचे क्षेत्र, रंगभूमी वरील त्यांचे कार्य, विदर्भ साहित्य संघ, नगर वाचनालय, जैताई देवस्थानच्या वतीने समाज प्रबोधनाचा उल्लेख करून अशा बहुप्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचा आज सन्मान करतांना अतिशय आनंद झाल्याचे सांगून अशा व्यक्तींची समाजाला खऱ्या अर्थाने आवश्यकता असल्याचे प्रतिपादीत केले. 
    
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश खुसपुरे यांनी केले. आभार विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुन्ना पोद्दार, मयूर गोएंका, नामदेव पारखी, मुलचंद जोशी, दिवाण फेरवानी, सागर मुने, प्रशांत महाजन इत्यादींनी परिश्रम घेतले.
माधव सरपटवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न माधव सरपटवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on April 21, 2023 Rating: 5
Powered by Blogger.