पाच बहिणी पोलिस खात्यात कार्यरत; हलाखीच्या परिस्थितीवर मात करत एकाच कुटुंबातील पाच बहिणी पोलिस खात्यात कार्यरत


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
                                     
सोलापूर : गरीबी पाचवीलाच पुजलेली, काम करेल तेव्हाच घरात खायला मिळायचे. घरात शिक्षणाचा कसलाही गंध नाही. अशा हलाखीची परिस्थितीत वाट काढत. परिस्थितीचा कधीही बाव न करता. आलेल्या संकटाना सामोरे जात. परिस्थितीला जिद्द बनवत एकाच कुटुंबातील पाच बहिणी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्या असुन एक पोलीस उपनिरीक्षक तर चार पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. खानापूर (जिल्हा उस्मानाबाद) येथील गटकूळ कुटुंबातील मुलींची ही प्रेरणादायी यशोगाथा. 
                       
खानापुर येथील रहिवासी असलेले गटकूळ कुटुंब. वर्षानुवर्ष घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. गावात एक वाडा व थोडीफार शेती. एकत्रित कुटुंब असल्याने, या शेतीवरच संपूर्ण कुटुंबीयांची उपजीविका चालत असायची. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती हि पूर्णपणे बेभरवशाची असायची. घरात सर्वजण अशिक्षितच असल्याने, घरात कसलाही शिक्षणाचा संबंध नाही. अशिक्षित घर म्हणून या घराकडे पाहिले जायचे. परंतु अशा स्थितीत देखील या गटकुळ कुटुंबातील बजरंग गटकुळ यांच्या तीन मुलींची व विक्रम गटकूळ यांच्या दोन मुलीची परिस्थितीवर मात करत वेगळे काहीतरी करून दाखवण्याची तेवढ्याच ताकदीने जिद्द. आपण शिकलो तरच घरची परिस्थिती बदलू शकते हे मुलींना चांगलंच ठाऊक होतं. लहानपणापासूनच मुली हुशार असल्याने व बजरंग गुटकूळ यांची मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्याजोगी आर्थिक परिस्थिती नसल्याने, त्यांच्या सारिका, लतिका मुलींच्या शिक्षणांचा संपूर्ण भार मावशी व मामांने उचलला. तर विद्याचे शिक्षण आईने काबाडकष्ट करून शिकवले. तर विक्रम यांनी नम्रता व सोनाली यांना कुटुंबाचा गाडा हाकत त्यातून बचत करत मुलींना शिक्षण दिले. घरच्या परिस्थितीचे भान ठेवून, मुलीही जिद्दीने शिकल्या, सारीका गटकूळ या क्रीडापटू असल्याने, राज्यपातळीपर्यंत मजल मारली. त्यातुनच त्यांना खाकी वर्दीचे आकर्षण निर्माण झाले. हि वर्दीच त्यांचे स्वप्न बनले.
                        
पोलीस खात्यात काम करणे हे मुळात आव्हानात्मक. त्यातही एका महिला म्हणून हे काम करणे अधिकच आव्हानात्मक ठरते. तरीदेखील त्यांनी आव्हान स्वीकारायचे असा निश्चय पक्का करून, कोणतीही अकॅडमी न लावता, कुणाचेही मार्गदर्शन नसताना. स्वयं अध्ययन व अनुभवातून शिकत पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. जिद्द एवढी कट्टर होती की, पहिल्या प्रयत्नात त्यांची महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये निवड झाली. त्यांचे यश इतर बहिणांना प्रेरणा मिळणारे होते. बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत सारिका यांच्या सख्या चुलत बहिणी नम्रता व सोनाली या दोघी एकाचवेळी पोलीस भरती झाल्या. खाकी वर्दीचे जणू या घराला वेडच लागले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. घरातील तीन बहिणी पोलिस खात्यात असल्याने, त्यांचे मार्गदर्शन घेऊन सारिका यांच्या सख्ख्या दोन बहिणी लतिका व विद्या या दोघीही एकाचवेळी पोलीस भरती झाल्या. गटकूळ या एकाच कुटुंबातील पाच बहिणी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्या. एवढ्यावरच न थांबता सारिका यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. दोन अपयशानंतर त्याची राज्यसेवेतुन पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. सध्या त्या बार्शी येथे निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्या सख्या बहिणी लतिका व विद्या उस्मानाबाद पोलीस दलात तुळजापूर पोलीस दलात कार्यरत आहेत. तर चुलत बहिण असलेल्या नम्रता या सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पंढरपूर येथे तर सोनाली या सोलापूर येथे निर्भया पथकात कार्यरत आहेत. त्यांचे हे यश इतर मुलींसाठी प्रेरणादायी असुन, वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरला जातो. मात्र, या वृत्तीला छेत देत मुलीही वंशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. याचं उत्तम उदाहरण आहे. 

यशस्वी होण्यासाठी परिस्थिती आडवी येत नाही. कठोर परिश्रम, जिद्द व संयम असणे खूप गरजेचे आहे. यशस्वी व्हायचे असेल, तर आपली स्वप्ने मोठी ठेवा. शिक्षकाकडून योग्य ते मार्गदर्शन घ्या व एकदा निवडलेल्या क्षेत्राशी प्रामाणिक राहा, यश कोणीच रोखू शकत नाही. एकमेकींची प्रेरणा घेत आज आमच्या कुटुंबातील आम्ही पाच बहिणी पोलिस खात्यात कार्यरत आहोत.

- सारीका बजरंग गटकूळ
पोलीस उपनिरीक्षक
निर्भया पथक बार्शी.
पाच बहिणी पोलिस खात्यात कार्यरत; हलाखीच्या परिस्थितीवर मात करत एकाच कुटुंबातील पाच बहिणी पोलिस खात्यात कार्यरत पाच बहिणी पोलिस खात्यात कार्यरत; हलाखीच्या परिस्थितीवर मात करत एकाच कुटुंबातील पाच बहिणी पोलिस खात्यात कार्यरत Reviewed by सह्याद्री चौफेर on March 19, 2023 Rating: 5
Powered by Blogger.