कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मुंबई : मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळावे, देशातीलच नव्हे तर परदेशातील माणसंही कामं पहायला यावीत, एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसे असावे हे इथं येऊन कळावे, असे जगातील सर्वोत्तम भवन उभे रहावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
मरिन ड्राइव्ह समोरील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, राहुल शेवाळे, आमदार दिवाकर रावते, सुनिल शिंदे, आशिष शेलार, मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठी भाषा भवनचे भूमिपूजन आणि फलकाचे अनावरण करण्यात आले.
उपस्थित जनसमुदायाला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षांच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, हे भवन केवळ मराठी भाषा भवन नसून ते आपल्या मातृभाषेचे मंदीर आहे. आज या शुभमुहुर्तावर आपल्या मातृभाषेच्या मंदिराचे भूमिपूजन करत आहोत. याचा आनंद, समाधान आहे. जबाबदाऱ्या पार पाडतांना काही जबाबदाऱ्या आयुष्याचं सार्थक झाल्याचा आनंद देणाऱ्या असतात. आजची जबाबदारी माझ्यासाठी अशीच माझ्या जीवनाचे सार्थक झाल्याचा आनंद देणारी घटना आहे.
मराठी भाषेच्या वाटचालीचा उल्लेख करतांना मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, मराठी माणुस म्हटलं की संघर्ष आलाच. भाषेनुसार प्रांतरचना झाली मात्र महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून, लढून मिळावावी लागली हा इतिहास आहे. त्याचे स्मारकही येथे जवळच आहे. जो इतिहास विसरतो त्याला भविष्य राहात नाही. मुंबईसाठी ज्यांचे आजोबा लढले, मुंबई मिळाल्यानंतर मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचा काम ज्यांनी केले. त्यांच्यासाठी मराठी भाषा भवन तयार करण्याची बाब अभिमानाची आहे.
या राज्यात दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कायदा करावा लागतो, ही वेळ का आली, ही विचार करण्याची गोष्ट आहे. जास्तीत जास्त भाषा शिकणे गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये.
पारतंत्र्य काय असते हे आपल्याला बघायला मिळाले नाही हे आपले नशिब आहे पण इंग्रजांच्या राजवटीत 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असा अग्रलेख लिहून इंग्रजाना लोकमान्य टिळकांनी मराठीतूनच जाब विचारला होता. मराठी भाषेचे महत्व यावरुन अधोरेखित होते. रोजच्या वापरातील प्रशासकीय मराठी भाषाही सोपी असावी, असा आग्रह मुख्यंमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला. व्यपगत, नस्ती सारखे शब्द कळायला कठीण आहेत त्याला पर्यायी शब्द सुचविण्याचे काम मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी हाती घेतले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची भाषा स्वभाषाच हवी हे ठणकावून सांगितले. एवढेच नाही तर राज्य व्यवहार कोश तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. शिवाजी महाराजांनी त्यांचे खलितेही सोप्या भाषेत केले.
इतर भाषेचा द्वेष नको पण त्यांचे आक्रमणही नको. कर्नाटकात मराठी भाषिकांवरचे अत्याचार सहन करायचे नाहीत. त्यांच्यावरील भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, सहन करणार नाही. छत्रपतींच्या तलवारीप्रमाणे मराठी भाषा आणि या भाषेचे तेज तळपले पाहिजे महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या मातृभाषेचे हे मंदिर आहे. याचे काम करतांना कुठलीही कमतरता नसावी असे निर्देशही श्री.ठाकरे यांनी दिले.
