कठीण काळातही सोडला नाही तिने आंधळ्या पतीचा हात

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : संसारिक जिवनाचची आधारवड बनत स्त्रियांनी आपलं स्त्री दायित्व जोपासलं आहे. कठीण काळातही त्या आधार बनून खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. खडतर वाटांना उडवत त्यांनी ध्येय गाठले आहेत. जीवनातील काळोख आपल्या डोळ्यात साठवून त्यांनी प्रकाशाची वाट मोकळी करून दिली आहे. स्त्री कुणाची प्रेरणा, कुणाची सावली तर कुणाचा आदर्श बनून समोर आली आहे. स्त्रि ही ममतेचा झरा असतांनाच वास्तल्याचा पाझर आहे. तिची रूपं अनेक आहेत. ती माता, भगिनी, पत्नी, मुलगी या सर्वच रूपांची सांगड घालते. माता बनून ती मुलाला घडवते, तर भगिनी म्हणून ती पाठीराखी बनते. पत्नी बनून ती जीव लावते, तर मुलगी म्हणून ती जिव्हाळा जपते. स्त्री आणी पुरुष ही संसाराच्या रथाची दोन चाके आहे, असे म्हणतात. एक चाक जरी डगमगलं तरी संसार डगमगतो. पण जीवनाच्या प्रत्येक वळणावर दोघांचीही एकमेकांना साथ राहिली तर संसाराचा गाडा सुरळीत चालतो. कुठलीही खंत न बाळगता संसाराचा भार वाहतांनाच जोडीदाराचा हात खांद्यावर ठेऊन त्याचा खंबीर आधार बनलेली ही माऊली खडतड वाट तुडवूनही जोडीदाराच्या जीवनाचा प्रकाश बनली आहे. आंधळ्या जोडीदाराशी कुटुंबीयांनी तिची गांठ बांधून दिली. पण तरीही तिने त्याची साथ सोडली नाही. "ज्याच्याशी जीवनाची बांधली गांठ, त्याला जीवनभर देईल साथ" हा निर्धार तिने केला. आंधळ्या पतीचा ती डोळा झाली. पतीच्या लाचारीची ती सदाचारी झाली. कष्ट उपसून तिने संसार फुलवला. अर्धांगिनी म्हणून तिने अर्ध्याच नाही तर पूर्णच संसाराचा भार उचलला. संसार डगमगू दिला नाही. उतरत्या वयातही तिने आपल्या खांद्यावरचा जोडीदाराचा भार व हात सरकू दिला नाही. कष्टाला पर्याय म्हणून आता ती पतीला सोबत घेऊन रस्त्यांनी फिरून भिक मागते. काबाड कष्ट करून मुलांना मोठं केलं. पण मुलं कुटुंबाचा आधार बनली नाही. एक मुलगा व्यसनाच्या आहारी गेला, तर एकाचे मानसिक संतुलन बिघडले. दोनही मुलं त्यांना म्हातारपणातही सुख देऊ शकले नाही. या उतरत्या वयात आई वडिलांना दोन घास देण्याऐवजी मुलं त्यांच्याच तोंडचा घास पळवू लागले. पैशासाठी त्यांनाच मारझोड करू लागले. ते म्हणतात ना, एकदा दुःख शिवलं की, दुःखाचीच सावली माग धरते. या मायमाऊलीचही असच झालं. दुःखाने साथ सोडलीच नाही. पण तिनेही परिस्थीसमोर लोटांगण घातलं नाही. पतीचा सांभाळ करत तिने परिस्थितीशी झुंज दिली, व आजही ती परिस्थीशी झुंज देत आहे. 

घाटंजी तालुक्यातील निर्मलाचा कुटुंबीयांनी मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील जगन गोविंदा कोकुडे या अंध युवकाशी विवाह लावून दिला. जगन कोकुडे हा जन्मतः अंध नसून तो तीन वर्षाचा असतांना त्याला माता (कांजण्या) निघाली, व त्याचे डोळे गेले. त्याने आनंदवन येथे आंधळ्यांच्या शाळेत शिक्षणही घेतले आहे. पण दुर्दैवाने त्याला अपंगाच्या कोठ्यातुन नोकरी मिळाली नाही. दरम्यान निर्मलाचा त्याच्याशी विवाह झाला. पती अंध असतांनाही तिने संसाराची गती होऊ दिली नाही. संसाराचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. त्याचा हात आपल्या खांद्यावर ठेऊन तिने जीवनाची मोट बांधली. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुलं उमलली. या माऊलीने कष्ट उपसून पोरांना मोठं केलं. मुलं कर्ती झाल्यानंतर कुटुंबाला हातभार लावतील अशी जन्मदात्यांना आशा होती. पण मोठा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला. व्यसन भागविण्यासाठी तोच आईकडे पैशाचा तगादा लावू लागला. छोटा मुलगा कुटुंबाचा आधार झाला असतांनाच त्याचे अचानक मानसिक संतुलन बिघडले. तो वेड्यासारखा वागू लागला. आई वडिलांनाच शिवीगाळ करून मारू लागला. आई वडिलांचं घरी राहणं कठीण झालं. अखेर कुणाचा आसरा घेत त्याच्यावर कसाबसा उपचार करून त्याला ठिक केलं. पण लॉकडाऊन काळात त्याला वेळेवर औषधं न मिळाल्याने परत त्याचे मानसिक संतुलन बिघडले. आता त्याच्या उपचारासाठी ही माऊली ग्रामपंचतेसह राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवत आहे. पण कुणीही तिला सहाय्यता करायला तयार नाही. तिच्या मुलाला आज उपचाराची नितांत गरज आहे. पण दातृत्वाची भावना दाखवायला कुणीही तयार नसल्याने तिचा नाईलाज होत आहे. तिच्या घराला तडे गेले आहेत, पण ग्रामपंचायत तिला घरकुल द्यायला तयार नाही. अपंगांसाठी शासनाच्या अनेक योजना असतांनाही कोकुडे परिवाराला त्यापासून वंचित राहावं लागत आहे. अंध जगन कोकुडे याला बासरी वाजविण्याची कला अवगत आहे. पण प्रशासनाची उदासीनता त्याला त्याचा छंदही जोपासू देत नाही. कुणीही त्याला मदत करायला तयार नाही. अंध जगन कोकुडे याला निराधार सहाय्यता निधी मिळते, पण माऊलीला मात्र मिळत नाही. कुंभा गावावरून काही दिवस मारेगाव तर काही दिवस वणी येथे रस्त्यांनी फिरून ही माऊली अंध पतीला सोबत घेऊन मागील काही वर्षांपासून भीक मागते. तिला भीक मागणे पसंत नाही, तिला मदतीची आस आहे. मुलगा मानसिक आजारातून बरा व्हावा, याकरिता ती ज्याला त्याला सहाय्यता मागत आहे. पण तिची नुसती अव्हेलनाच सुरु आहे. लोकप्रतिनिधींकडे ती नेहमी मदतीसाठी साकडे घालत असते. पण तिला मदत करण्यास कुणाचेही हात सरसावत नाही. तरीही ती कुणीतरी सहाय्यता करेल, या भाबळ्या आशेवर आपली आपबिती कथन करत असते.
कठीण काळातही सोडला नाही तिने आंधळ्या पतीचा हात कठीण काळातही सोडला नाही तिने आंधळ्या पतीचा हात Reviewed by सह्याद्री चौफेर on March 08, 2022 Rating: 5
Powered by Blogger.