तालुक्यात ओव्हरलोड वाहतुकीला उधाण, वनोजा व गौराळा येथून सुरु आहे सर्रास ओव्हरलोड वाहतूक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील वांजरी व गौराळा या गावालगत लाईमस्टोनच्या खाणी असून लाईमस्टोनचे उत्खनन करून मोठ्या प्रमाणात लाईमस्टोन मुकुटबन येथील एमपी बिरला सिमेंट कंपनीमध्ये पाठविला जातो. या सिमेंट उपयोगी दगडाची वणी तालुक्यातून ओव्हरलोड वाहतूक सुरु असून प्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित आहे. शेकडो ट्रक दररोज वांजरी व गौराळा येथून मुकुटबन सिमेंट कंपनीत लाईमस्टोनची वाहतूक करतात. या ट्रकांमध्ये निर्धारित पासिंग क्षमतेपेक्षा अधिक टन लाईमस्टोन भरून ओव्हरलोड वाहतूक केली जाते. कार्यवाहीची कसलीही भीती न बाळगता दिवसभर ओव्हरलोड वाहतूक सुरु असते. तीन चार दिवसांपूर्वी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा मोठा फौज फाटा वणीला आला होता, पण त्यांनी ओव्हरलोड वाहनांवर कुठलीही कार्यवाही न केल्याने शहरात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. वाहतूकदारांना मासिक पास देऊन ओव्हरलोड वाहतुकीला सुरक्षा पुरविण्याची जुनी पद्धत अजूनही सुरु आहे की काय, अशी चर्चा आता कार्यवाही होत नसल्याने ऐकायला मिळत आहे. मागील अनेक महिन्यांपासून तालुक्यातून ओव्हरलोड वाहतूक सुरु आहे. वाहतूकदारांना वाहनांवर कार्यवाही होण्याची भीतीच राहिली नसल्याचे सर्रास सुरु असलेल्या ओव्हरलोड वाहतुकीवरून दिसून येत आहे. वाहतूकदारांशी ठेवण्यात येनारया आर्थिक हितसंबंधामुळे अधिकाऱ्यांकडून ओव्हरलोड वाहतुकीला क्षय मिळत असल्याचे बोलल्या जात आहे. आधी प्रादेशिक परिवहन अधिकारी ओव्हरलोड वाहतुकीवर लक्ष ठेऊन वाहनांवर धडक कार्यवाही करायचे. ओव्हरलोड वाहतूक होणाऱ्या मार्गांवर गस्त घालून वाहनांची धरपकड करायचे. त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक पूर्णतः नियंत्रणात आली होती. वाहतूकदारही ओव्हरलोड वाहतूक करण्यास धजावत नव्हते. ओव्हरलोड मालवाहतूक करतांना वाहतूकदारांचे धाबे दणाणत होते. पण अधिकारीच आता वाहतूकदारांशी हितसंबंध जोपासू लागल्याने वाहतूकदारांना कार्यवाहीची भीतीच उरलेली नाही. त्यामुळे तालुक्यात ओव्हरलोड वाहतुकीला उधाण आले आहे. 

गौराळा व वांजरी येथून लाईमस्टोनची ओव्हरलोड वाहतूक करणारे ट्रक वणी, शिरपूर व मुकुटबन पोलिस स्टेशनच्या हद्दीतून बिनधास्त ओव्हरलोड वाहतूक करतात. पण कोणत्याही पोलिस स्टेशन मधिल पोलिसांकडुन या ओव्हरलोड ट्रकांवर कार्यवाही होतांना दिसत नाही. एरव्ही कोणतेही कारण नसतांना ट्रकांवर कार्यवाही करणाऱ्या पोलिसांची दिवसाढवळ्या ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर नजर पडू नये, याचेच नवल वाटते. की, ट्रकचे नंबर पाहून कार्यवाही होते, हेच कळायला मार्ग नाही. नवीन ट्रक मार्गावर सुरु झाल्याचे समजताच शिरपूर पोलिस कायर येथे तळ ठोकून त्या ट्रकांवर कार्यवाही करतात. तर मुकुटबन पोलिस आपल्या कार्यक्षेत्रात ते ट्रक अडवितात. शहरातील वाहतूक पोलिस तर त्या ट्रकाना जागो जागी थांबवुन ट्रक मालकाला वेठीस आणुन सोडतात. त्यानंतर पोलिसांना हाताशी धरून वाहतूकदार वाहनांची एन्ट्री रक्कम भारतात. आणी वाहन चालविण्याच्या मार्गातील पोलिसांचे अडथळे दूर करतात. यामुळेच ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलल्या जात आहे. तिघे जण बसलेल्या दुचाकीवर धडक कार्यवाही, व १५ टन ओव्हरलोड माल असलेल्या वाहनांवर कार्यवाही नाही. हा दुजाभाव नाही काय, असे प्रश्नही आता उपस्थित होऊ लागले आहे. छोट्या मालवाहतुकीची वाहने, कार, दुचाकी व अन्य छोट्या मोठ्या वाहनांवर चौकाचौकात व रस्त्यांनी फिरून वाहतूक पोलिस कार्यवाही करतात. मग रस्त्यांची दुर्दशा करणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीवर कार्यवाही का केली जात नाही, असा प्रश्न पडायला लागला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारीही वणी तालुक्यात ओव्हरलोड वाहतूक सुरु असतांना देखील ओव्हरलोड वाहनांवर कार्यवाही करतांना दिसत नाही. वणीला येऊनही ते ओव्हरलोड वाहतूक होणाऱ्या मार्गांवर गस्त घालतांना दिसत नाही. ते सुद्धा ट्रकचे नंबर पाहूनच कार्यवाही करतात की काय, असे वाटू लागले आहे. कित्येक वाहनांचे फिटनेस, टॅक्स, इन्शुरन्स लॅप्स झाले आहेत. तरीही हातचलाखी करून ट्रक मालक कंपन्यांमध्ये वाहन चालविण्याची परवानगी मिळवून घेत आहे. स्कॅनिंग करून ट्रकच्या कागदपत्रांच्या तारखा वाढविल्या जात आहे. तरीही आरटीओ अनभिज्ञ असून कागदपत्रांची साधी तपासणी करण्याचे सौजन्यही आरटीओ दाखवीतांना दिसत नही. आरटीओंनी काही वर्षांआधी ज्या ओव्हरलोड वांहनांना ऑनलाईन चलान केले आहे, ते देखील चलान वाहतूकदारांनी अद्याप भरले नसल्याचे समोर आले आहे. ४२ टनांची पासिंग असलेल्या ट्रकांमध्ये ५५ टन माल भरून पासिंग नियमांचे सर्रास उल्लंघन केल्या जात आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे नव्यानेच बांधण्यात आलेले रस्ते उखडू लागले आहेत. रस्त्यांवर अल्पावधीतच खड्डे पडू लागले आहे. ट्रकांमध्ये वरपर्यंत दगडं भरले जात असल्याने भरधाव ट्रकांमधून एखादा दगड दुचाकीस्वारावर पडल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ओव्हरलोड वाहतुकीला आळा बसने गरजेचे आहे. त्याकरिता ओव्हरलोड वाहनांवर कार्यवाही होणे आवश्यक असून तशी मागणी आता तालुक्यातून होऊ लागली आहे. 


तालुक्यात ओव्हरलोड वाहतुकीला उधाण, वनोजा व गौराळा येथून सुरु आहे सर्रास ओव्हरलोड वाहतूक तालुक्यात ओव्हरलोड वाहतुकीला उधाण, वनोजा व गौराळा येथून सुरु आहे सर्रास ओव्हरलोड वाहतूक Reviewed by सह्याद्री चौफेर on January 20, 2022 Rating: 5
Powered by Blogger.