अतिवृष्टीचे पैसे नाही, विमा कंपनीचे हात वर, महावितरणचा कनेक्शन तोडण्यावर भर, व्यापाऱ्यांची लुटमार वरून नैसर्गिक संकटांचा भार, सांगा शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२७ ऑक्टो ल.) : "अतिवृष्टीचे पैसे नाही, विमा कंपनीचे हात वर, महावितरणचा कनेक्शन तोडण्यावर भर, व्यापाऱ्यांची लुटमार वरून नैसर्गिक संकटांचा भार, सांगा शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं" 
नैसर्गिक संकटामुळे अगोदरच आर्थिक कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी पुन्हा निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे मरण दारात असताना शासनाचे हसू गालात अशी परिस्थिती दिसून येत आहे यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही, विमा कंपनीने हात वर केलेत, विद्युत बिल न भरल्यामुळे महावितरणचा कनेक्शन तोडण्यावर भर आणि जे काही पिकले त्याला योग्य भाव नसल्याने व्यापाऱ्यांची लुटमार यासह नैसर्गिक संकटांचा भार अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं असा प्रश्न पडला आहे.

 यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व ईसापुर धरण प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील नदी-नाल्या काठावरची हातातोंडाशी आलेली पिके नेस्तनाबूत झालीत अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून आज पर्यंत कुठलीच मदत मिळाली नाही असे असताना विमा कंपनी शेतकऱ्याकडे पाहत नसतांना महावितरण कंपनी रब्बी पिकासाठी लागणारी विज रब्बी पिकाच्या लागवडीच्या तोंडावर तोडण्याचा कार्यक्रम चालू केला असताना व्यापार्‍या कडूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत आहे. अशावेळी आम्ही कोणाकडे जावे अशी आर्त हाक तालुक्यातील शेतकरी शासनाकडे करत आहे.

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तुर, ऊस इत्यादी सर्व पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासन स्तरावर जिल्हयाची आणेवारी मात्र साठ पैशाच्यावर दाखवण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय अनुदान व पिक विमा मिळण्याची सुतराम शक्यता नाही. अशावेळी शासकीय व्यवस्थेवर दबाव टाकण्याची जबाबदारी ही राजकीय नेत्यांची असते परंतु त्यांना शेतकऱ्यांबद्दल पुतना मावशी चे प्रेम फक्त निवडणुकीच्या वेळी दिसते त्यामुळे शेतकरी अधिक आर्थिक संकटामध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खरीप हंगामामध्ये खतांचे व बियाण्याचे भाव गगनाला भिडले होते. मधल्या काळामध्ये सोयाबीनचा भाव दहा हजाराच्या पलीकडे पोचला होता परंतु शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे व्यापाऱ्यांचे फावले असून आज सोयाबीनचा भाव 5000 च्या भोवती फिरत आहे. अशा परिस्थितीमध्ये लागवडी साठी लागणारा खर्च नीघण्याची शक्यता नाही पिक विमा कंपन्या गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना लुटून आपले उखळ पांढरे करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांकडून दबाव आणण्याची जबाबदारी असताना ते कुठलेही पाऊल उचलायला तयार नाहीत.

ईसापुर धरण प्रशासनाबाबत अनेक तक्रारी असून सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कार्यवाही होत नाही. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी वरून पाऊस असतांना सुद्धा धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे नदी नाल्याकाठची सोयाबीनची पिके अक्षरशः नदीपात्रात वाहून गेली असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पहावयास मिळाले. आता शासन शेतकऱ्याच्या मृत्यू सर्वांनी मिळून केल्यामुळे कसा होतो हे सोशल मीडियावर पाहण्याची ची वाट पाहत आहे का? असा प्रश्न निर्माण केला जात असून, महावितरण कंपनीकडून शेतीचे वीज तोडणी त्वरित थांबवावी असा आग्रह शेतकरी करीत आहे.
अतिवृष्टीचे पैसे नाही, विमा कंपनीचे हात वर, महावितरणचा कनेक्शन तोडण्यावर भर, व्यापाऱ्यांची लुटमार वरून नैसर्गिक संकटांचा भार, सांगा शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं अतिवृष्टीचे पैसे नाही, विमा कंपनीचे हात वर, महावितरणचा कनेक्शन तोडण्यावर भर, व्यापाऱ्यांची लुटमार वरून नैसर्गिक संकटांचा भार, सांगा शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं Reviewed by सह्याद्री चौफेर on October 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.