सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (५ ऑक्टो.) : शहरातील विठ्ठलवाडी व गौरकार ले-आऊट हा परिसर कायम दुर्लक्षित राहिला आहे. रस्ते व नाल्यांची समस्या अद्यापही जैसे थे च आहे. लोकप्रतिनिधींनी या भागातील समस्या सोडविण्याची कधी मानसिकताच दाखविली नाही. अस्वच्छतेच्या साम्राज्यात येथील नागरिकांचं जगणं सुरु आहे. डुकरांच्या प्रादुर्भावाने जनता त्रस्त आहे. येथील प्रतिष्ठित लोकांच्या घरासमोर घाण पाणी साचलेलं असतं. ४० वर्षाचा कालावधी लोटला तरी या भागातील काही ठिकाणी पक्के रस्ते बांधण्यात आलेले नाही. गौरकार ले-आऊट परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. नगर परिषदेच्या तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये विजय संपादन करून नगर सेवक म्हणून मिरवणाऱ्या त्या नगर सेवकाने जनतेची चांगलीच दिशाभूल केली आहे. मिठी छुरी बनून नागरिकांच्या विश्वासाचा गळा कापला आहे. गौरकार ले-आऊट मधील सिमेंट रस्ता बांधतांना काही रस्ता अर्धवट सोडला तो अद्यापही बांधला नाही. त्या रस्त्याचे कागदोपत्रीच बांधकाम पूर्ण दाखविले की काय असा संशय आता यायला लागला आहे. त्याला रस्ता अर्धवट का सोडला याबाबत येथील नागरिक नेहमी विचारतात. पण त्या नगर सेवकाचे एकच उत्तर असते रस्ता मंजूर आहे, एवढ्यात बांधकाम सुरु करायचे आहे. पण त्याचे हे आश्वासन ऐकता ऐकता आता १५ वर्षाचा काळ लोटला आहे. आता तर तो प्रभागातील अन्य नगर सेवकांकडे बोट दाखवतो व मला आत निवडणुकच लढायची नाही, असे उत्तर देतो. नगर पालिकेत वार्डाचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेल्या नगर सेवकांनी वार्डाचा कमी व स्वतःचाच जास्त विकास साधला आहे. काही नगर सेवकांनी नगर पालिकेचे प्रतिनिधित्व करीत स्वतःला चांगलेच स्टॅन्ड करून घेतले आहे. काही नगर सेवक कंत्राटदार व व्यावसायिक झाले आहेत. तर काही नोकरी धारक व व्यावसायिकच नगर सेवक म्हणून निवडून आले आहेत. मग वार्डाची विकासकामे करण्याकरिता वेळ कुणाजवळ आहे. एक हाती सत्ता असूनही व या परिसरातील समस्या माहित असूनही तसेच याच परिसरातील रहिवासी असूनही या परिसरात विकासगंगा वाहिली नाही. प्रतिष्ठितांची वस्ती म्हणून ओळखला जाणारा विठ्ठलवाडी परिसर अजूनही समस्यांच्या विळख्यातच अडकला आहे. रस्त्यांची दुर्दशा, नाल्या सताड उघड्या, अस्वच्छता पसरलेली, घाणीची दुर्गंधी, घरांसमोर घाण पाणी साचलेले, डुकरांचा अंगण आवारात वावर, रस्त्यावर पाण्याचे डबके साचलेले, यामुळे मागासला भाग म्हणून विठ्ठलवाडी व गौरकार ले-आऊट परिसराची ओळख निर्माण झाली आहे. विठ्ठलवाडी परिसरातील नाल्या अद्यापही भूमिगत झाल्या नाही. विठ्ठलवाडी परिसरातील एका ठिकाणी भूमिगत गटार योजनेंतर्गत एक नाली भूमिगत करण्यात आली. पण ती नाली शेवट पर्यंत भूमिगत न करता, शेवटच्या टोकातील घराजवळ नालीची पाईप लाईन उघडी ठेवण्यात आली. त्या ठिकाणी आता गटार साचले आहे. या गटारात आता डुकरांचा वावर असतो. घरांसमोर नेहमी घाण पाणी साचलेले असते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविण्याचे नगर पालिकांना सुचविले असतांनाही या ठिकाणी स्वच्छतेच्या नावावर बोंबा आहेत. रोगराईचा काळ सुरु आहे. संसर्गजन्य आजारांनी थैमान घातले आहे. डेंग्यू मलेरिया सारख्या आजाराने नागरिक ग्रस्त आहेत. डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण निर्जंतुकीकरणाच्या फरवारण्या मात्र करण्यात येत नाही. नगर पालिकेची फॅगिंग मशीन नेमकी कुठे फिरते हेच कळायला मार्ग नाही. की, फॅगिंग मशीनच अडगडीत टाकल्या आहेत, याचीच शंका वाटते. या परिसरात आजी माजी नगर सेवकांच वास्तव्य आहे. माजी नगराध्यक्षांचे निवासस्थान असलेला हा परिसर आहे. पण या परिसराच्या नशिबी नेहमी उपेक्षितपणाच आला आहे. शहराच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या परिसराचा विकास नेहमी शेवटीच साधला जातो. या परिसरातील समस्या सोडविण्यास तेवढं महत्वच दिल्या जात नाही. त्यामुळे कित्येक वर्षानंतर या परिसरात थोडाफार विकास साधला जातो. आता या परिसरातील समस्या सोडविण्याकरिता आणखी किती कालावधी लागतो, हा येणार काळच सांगेल.
विठ्ठलवाडी व गौरकार ले-आऊट मधील समस्या कधी सुटणार का हो !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 05, 2021
Rating:
