तृष्णा, कुठेतरी थांबण्यासाठी मनाचा स्टॉप लागतो!

                           "तृष्णा" 

तृष्णा कशाचीही असो ती भागल्याविना मनुष्याच्या मनाला शांती मिळत नाही. उन्हांतून दमून आलेल्या पांथस्थाला पाण्याच्या घोटाची तृष्णा असते. कोणाला पैसे कमवण्याची तर कोणाला ईश्वरभक्तीची तृष्णा असते. तृष्णा म्हणजे तहान किंवा ध्येय प्राप्तीची इच्छा,अभिलाषा निर्माण होणे. परंतु ती पूर्ण झाली नाही तर त्या व्यक्तीच्या मनात राग, क्रोध, मत्सर असे नकारात्मक विकार निर्माण होतात. ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ती व्यक्ती टोकाचे निर्णयही घेते. तृष्णा इंद्रियांची किंवा मनाची असते. तृष्णा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची धडपड चालू असते.
          
आपल्याला काहीतरी लाभ व्हावा या आसक्तीने ती व्यक्ती झपाटून जाते. तृष्णा म्हणजे माणसाच्या अंतर्गत असणारी शक्ती किंवा बळ होय. त्यात संपूर्ण जगाची उलथापालथ होऊ शकते. धनाची लालसा किंवा तृष्णा असेल तर धन कमविण्यासाठी मनुष्य जीवाचा आटापिटा करतो. साम, दाम, दंड, भेद वापरून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा मनाप्रमाणे गोष्ट घडली तर त्याच्या मनाची तृप्ती होते. त्याची लालसा,वासना संपते. पण ती मिळेपर्यंत त्याच्या जीवाला शांती मिळत नाही. उन्हांत फिरून जीव कासावीस झाला तर थंडगार पाण्याची इच्छा मनात उत्पन्न होते आणि ते मिळताच आत्म्याची तृप्ती होते.जीवाला थंडावा मिळतो. 
                      
आता काही नको अशी मनोवृत्ती बनते. परंतु ते मिळेपर्यंत जीवाची वणवण होत असते. गौतम बुद्ध किंवा तथागत यांच्या मते जीवाने अशी लालसा धरणे योग्य नाही. त्यामुळे माणसाच्या वर्तनात फरक होतो. त्यामुळे नात्यांची तमा बाळगली जात नाही. माणुसकी हरवत जाते. तृष्णा पूर्ण होईपर्यंत नारायणाचा नर बनायलाही कमी नाही. थोडक्यात तृष्णा किंवा हव्यास इतका पण नको की ज्याने आपल्या जीवनावर दुष्परिणाम व्हावा. आपले सुखी समाधानी सुरळीत जीवन नरकमय व्हावे. चांगल्या गोष्टीची तृष्णा असेल तर आयुष्याचे नंदनवन बनेल. परमेश्‍वर दर्शनाची तृष्णा असेल तर तो मनुष्य भक्तीत डुबून होऊन जातो. त्याला संसार असार असल्याचे कळून चुकते. 
              
या नश्वर मोहमयी जीवनात तो साधूचे जीवन जगू लागतो. परमेश्वर दर्शनाची ओढ त्याला सतावते आणि ईश्वर नामातच तो तल्लीन होतो. आपले संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथांनाही परमेश्वर दर्शनाची ओढ लागली होती. त्यांनी समाज सुधारण्याचे काम करता करता अभंग, कीर्तन आणि ओव्यांची रचना केली. अंधारात चाचपडत असलेल्या समाजाला योग्य अशी शिकवण दिली. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, भेदाभेदांचे महत्त्व पटवून दिले. परमेश्वर भक्तीचे महत्त्व पटवून दिले. अंधश्रद्धा, जुन्या रुढी, परंपरा समाजाला घातक आहेत, त्यांचा निःपात करावा. त्यामुळे माणसाचे जीवन नरक बनते हे आपल्या रचनांतून त्यांनी पटवून दिले. संतांनी सत्कर्माची तृष्णा ठेवली त्यामुळे आजही त्यांच्या रचना शिकवणरूपी समाजात रूढ झाल्या आहेत. समाजाचे परिवर्तन करण्यास सक्षम आहेत. चांगल्या गोष्टींची तृष्णा चांगलाच परिणाम दाखवते परंतु वाईट कर्म वाईट हेतू ठेवून केलेली तृष्णा मनुष्याला रसातळाला पोहोचवते. चांगल्या गोष्टीचा शेवटही चांगलाच होतो. म्हणून आपण सदाचार, सद्वर्तन आणि संतसंगती कधीच सोडू नये.
              
तृष्णा ही मनाची अशी धारणा आहे की ती पूर्ण होईपर्यंत त्याला चैन पडत नाही. तिची पुर्ती होईपर्यंत मनुष्य आकाश-पाताळ एक करतो. जसे की पैसे कमवण्याची तृष्णा असेल तर इच्छित रक्कम मिळेपर्यंत तो पैशाच्यापाठी लागलेला दिसतो. त्याला पैशापुढे दुसरे काही सुचत नाही. ती पूर्ण व्हावी म्हणून तो कोणताही उपाय करतो. तंत्र-मंत्र, करणी, विद्या सारखे अघोरी उपायांचाही अवलंब करतो. तसेच मेहनत, कष्टाशिवाय चोऱ्यामाऱ्या, दरोड्यातील कोणताही पर्याय निवडतो आणि या लालसेला शेवट नसतो. कुठेतरी थांबण्यासाठी मनाचा स्टॉप लागतो. पण त्या तृष्णेच्या इतक्या आहारी जातो आणि स्वत्व गमावून बसतो. इतका की तो रसातळाला जाऊ शकतो. जेव्हा त्याला पश्चातापाची वेळ येते आणि परतीचे मार्ग बंद झालेली दिसते. सुधारण्याची वेळ निघून जाते. नातेवाईकांनी दरवाजे बंद केलेले असतात तेव्हा त्याला सत्याची जाणीव होते. परंतु तो परतू शकत नाही आणि त्याचे जीवनच संपून जाते.
~ सौ.भारती सावंत 
मुंबई
9653445835
तृष्णा, कुठेतरी थांबण्यासाठी मनाचा स्टॉप लागतो! तृष्णा, कुठेतरी थांबण्यासाठी मनाचा स्टॉप लागतो! Reviewed by सह्याद्री चौफेर on September 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.