कोरोनामुळे बंद असलेली चित्रपटगृहे मोजत आहे अखेरच्या घटका, कर्जाचा डोंगर वाढल्याने चित्रपटगृहांचं अस्तित्व धोक्यात
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२४ ऑगस्ट) : कोरोना या साथ रोगाच्या उद्रेकानं संपूर्ण जीवनमानचं बदलून गेलं. या वैश्विक महामारीने नागरिकांमध्ये दुरावा निर्माण करण्याबरोबरच नागरिकांची पूर्ती कोंडी करून सोडली. भितीच्या सावटात जीवन जगतांना इतरांचा सहवासही नकोसा वाटू लागला. संबंधितांची जवळीकही मनात धास्ती निर्माण करू लागली. नात्यातील गोडव्यातही कोरोनाने कटुता निर्माण केली. जिवन विटाळल्यागत वाटू लागलं. कोरोनाने जीवन जगण्याचे संदर्भच बदलून टाकले. आनंदी जीवनावर पार विरजण आणलं. मानवी जीवनात दुही निर्माण झाली. एकलकोंडं जीवन या काळात नशिबी आलं. न समजणाऱ्यांनाही कर्फ्यू काय असतं, हे कोरोनाने समजावून दिलं. नैराशेच्या गर्तेत जीवन जगतांना प्रत्येकच जीव वैतागला होता. कोरोनामुळे कोंडाळलेल्या या जीवनाची कोंडी केंव्हा फुटेल ही एकच आस जीवनाची कास धरून होती. कोरोनाच्या लाटांनी बंद झालेल्या वाटा पूर्णपणे बंधनातून मुक्त व्हाव्या, ही आशा या निराशालेल्या जीवांना लागली आहे. कोरोनाचं सावट हळूहळू निवळू लागलं आहे, पण जीवन आद्यपही पूर्वपदावर आलेलं नाही. अजूनही जीवनात आनंद भरणारी प्रेक्षणीय स्थळं बंदच आहेत. मागील दोन वर्षांपासून सिनेमांचे चित्रीकरण बंद असल्याने चित्रपट गृहांना टाळे लागले आहेत. टॉकीज मध्ये कोणता पिक्चर लागला आहे, चल न पिक्चर पाहायला जाऊ हे शब्दच आता कानावर पडणे बंद झाले आहे. चित्रपटगृह पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास अद्यापही परवानगी देण्यात न आल्याने चित्रीकरण झालेले चित्रपटही अद्याप प्रदर्शित होऊ शकलेले नाहीत. कुटुंबासोबत किंवा दोस्तमित्रांबरोबर चित्रपट गृहात जाऊन सिनेमा बघण्याची मजाच काही और असायची. ही मजाच कोरोनाने हिरावली आहे. मनोरंजनाची अनेक साधने विकसित झाली असली तरी चित्रपटगृहांचं आकर्षण प्रेक्षकांमध्ये नेहमी कायम राहीलं आहे. जीवनाच्या गोतावळ्यातून काही वेळ काढून कुटुंबासोबत आनंदात घालविण्या करिता चित्रपट बघण्याचा बेत आखल्या जायचा. विरंगुळा म्हणूनही टॉकीजमध्ये जाऊन चित्रपट बघणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. टॉकीजमध्ये एखाद्या आवडत्या नटानटींचा चित्रपट पाहण्यास जमलेल्या गर्दीचा आपणही साक्षीदार व्हावं या आकर्षणानंही कित्येकांची पावले चित्रपटगृहांकडे वळायची. मोठ्या पडद्यावर, मोठ्या आवाजात, सर्वांसोबत हास्य कल्लोळात सिनेमा बघतांना काही वेळ का होई ना नैराश्य चिंता मात्र दूर व्हायच्या. मनोरंजनाची निरनिराळी साधने उपलब्ध असतांनाही चित्रपटगृहांनी आपली वैविधता नेहमीच टिकवून ठेवली.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून चित्रपटगृहे बंद आहेत. आर्थिक स्रोतच बंद झाल्याने दैनंदिन खर्च भागविनेही कठीण झाले आहे. शासनाने सेवाकर व वीज बिलात कोणतीही सूट दिलेली नाही. चित्रपटगृहाच्या आधुनिकीकरणाकरिता बँकांमधून घेतलेले कर्ज भरणेही कठीण झाले आहे. छोटयामोठ्या पॉपर्टी विकून ईएमआय भरावी लागली. मागील २५ वर्षांपासून चित्रपटगृहात कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांचा खर्चही आम्हालाच उचलावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा खर्चही उचलावा लागत आहे. आमच्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही बराच खर्च झाला. आता घर खर्च भागविण्याचीही ताकद उरली नाही. चित्रपटगृह असोसिएशनचे अध्यक्षीय मंडळही चित्रपटगृह सुरु करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करित नाही. वाहतुकीची साधने, सभा सम्मेलने, लग्न सोहळे, हॉटेल व्यवसाय लोकांच्या गर्दीत सुरु आहेत. पण चित्रपटगृहांवर मात्र अन्याय करण्यात आला आहे. ५० टक्के उपस्थितही चित्रपटगृहे सुरु करण्यास अनुमती दिली तरी शासनाचे आभार मानून चित्रपटगृहे सुरु करण्याची आमची तयारी आहे. नाहीतर पुढे कुटुंबाचा खर्चही भागविणे कठीण होईल. चित्रपटगृहे सुरु करण्यास शासन अनुमती देत नसेल तर जीवनमुक्त होण्याची परवानगी द्यावी, अशी आगतिकता व संतप्त प्रतिक्रिया दिप्ती चित्रपटगृहाचे मालक सत्यजित दीपक ठाकूरवार यांनी व्यक्त केली आहे.
नैराश्यलेल्या जीवनात आनंद व बेरोजगारीत खितपतलेल्यांना परमानंद मिळण्याकरिता चित्रपटगृहे सुरु करण्यावर विचार होण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. चित्रपटगृहांचं अस्तित्व लोप पावण्याआधी मनोरंजनाची ही स्थळं सुरु करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
कोरोनामुळे बंद असलेली चित्रपटगृहे मोजत आहे अखेरच्या घटका, कर्जाचा डोंगर वाढल्याने चित्रपटगृहांचं अस्तित्व धोक्यात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 24, 2021
Rating:
