खनिज संपत्तीनं नटलेल्या तालुक्यात जगावं लागतं गरिबी-लाचारीचं जिणं

                       (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.१३) : हाताला कामं नाही, जगण्याला आधार नाही, रोजगाराच्या वाटा शोधाव्या तरी कुठे, उंबरठे झिजवूनही रोजगार उपलब्ध होतांना दिसत नाही. या व्यथा आता बेरोजगारीची झळ सोसत असलेल्या प्रत्येकांच्याच झाल्या आहे.

बेरोजगारी वणव्यासारखी पेटली असून बेरोजगार वर्ग त्यात होरपळला जात आहे. बेरोजगारीमुळे जनजीवन पार विस्कळीत झालं आहे. रोजगार मिळण्याकरिता उद्योग, कंपन्या, कारखाने व व्यावसायिक प्रतिष्ठानांवर चकरा मारणे हा बेरोजगारांचा दिनक्रम झाला आहे. रोजगार मिळवून देण्याकरिता शिफारसदारांचे उंबरठे झिजवून त्यांना विनवण्या करतानाचे विदारक चित्र शहर व तालुक्यात पाहायला मिळत आहे. काही बेरोजगार युवक रोजगार मिळवून देण्याच्या आशेपोटी लोकप्रतिनिधींच्या घराची वाट धरत आहे, पण त्यांच्या वाट्याला फक्त नैराश्यचं येत आहे.

खनिज संपत्तीनं परिपूर्ण असलेला वणी तालुका रोजगार निर्मितीत मागासला असून रोजगार उपलब्ध करून देण्यात लाचार झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात बेरोजगारांच्या फौजा तयार होत असून तालुक्याचा बेरोजगारी दर वाढत चालला आहे. परिपूर्ण रोजगार देणारे उद्योग खेचून आणण्यात लोकप्रतिनिधींनी कधी रसच दाखविला नाही. तालुक्यात कोळशाच्या खाणी आहेत, पण तालुक्यात एकही वीज प्रकल्प नाही. कापसाचं भरगोस उत्पादन होतं, पण अद्यापही सूत गिरणी पूर्णत्वास आलेली नाही. चुना उद्योगांनाही पुरेसा कच्चामाल मिळत नसल्याने घरघर लागली आहे. वणी येथील एमआयडीसी नावालाच असून याठिकाणी रोजगार देणारा एकही मोठा उद्योग किंवा कारखाना नाही. कोळसा खदानींशी संलग्न कंपन्या याठिकाणी कार्यरत आहे, पण तालुक्यातील बेरोजगारांना या कंपन्यांचा विशेष लाभ झाल्याचे दिसत नाही.

परजिल्हा व परप्रांतातील कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात याठिकाणी कार्यरत आहे. ज्यांना शिफारस मिळाली, त्यांना या कंपनीत नोकरी मिळाली. ज्यांना जगण्याचा आधार आहे, ते शिफारशींच्या जोरावर या कंपन्यांमध्ये नोकरीवर लागले आहेत. तर ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे, ते आजही वनवनचं भटकत आहे. कोल वॉशरी सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, ही भाबळी आशा ठेवणाऱ्या बेरोजगारांची घोर निराशा झाली आहे. कोल वॉशरीनेही आवश्यक्तेला प्राधान्य दिलं नाही. तर गावखेड्यातील नेत्यांच्या शिफारशींवर तुटपुंज्या मासिक वेतनावर कामगार नियुक्त केले. कोल वॉशरी अद्यापही पूर्ण क्षमतेनं सुरु न झाल्यानं रोजगाराचं गणित जुडलेलं दिसत नाही. तालुक्यात रोजगाराची वानवा असून रोजगाराच्या उपलब्धते अभावी बेरोजगारांचं आता जगणं कठीण होऊ लागलं आहे. 


खनिज संपत्तीनं नटलेल्या तालुक्यात जगावं लागतं गरिबी-लाचारीचं जिणं खनिज संपत्तीनं नटलेल्या तालुक्यात जगावं लागतं गरिबी-लाचारीचं जिणं Reviewed by सह्याद्री चौफेर on June 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.