सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : भारतीय कष्टकरी जनसंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष राकेश नाकाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील २३ नालेसफाई कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेतील नालेसफाईचे कंत्राट घेतलेले कंत्राटदार दीपक उत्तराधी यांनी संबंधित २३ कामगारांच्या ईपीएफची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नसल्याची बाब निदर्शनास आली होती.
या गंभीर प्रकरणासंदर्भात भारतीय कष्टकरी जनसंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राकेश नाकाडे यांनी संघटनेचे मार्गदर्शक माननीय ॲड. डॉ. गुणरत्न सदावर्ते तसेच संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेंद्र साबळे यांच्याशी सविस्तर चर्चा व मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ईपीएफ कार्यालयाकडे अधिकृत तक्रार दाखल करून संबंधित कंत्राटदाराविरुद्ध चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली.
या तक्रारीच्या अनुषंगाने ईपीएफ विभागामार्फत चौकशी करण्यात आली. चौकशीअंती संबंधित प्रकरणात अंदाजे १३ लाख ७९ हजार रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली. विशेष म्हणजे, सदर रक्कम आज संबंधित कामगारांच्या ईपीएफ खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे.
कामगारांच्या हक्काच्या पैशांसाठी संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, २३ कामगारांना त्यांच्या हक्काची आर्थिक सुरक्षा मिळाली आहे.
या कारवाईमुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व संबंधित कामगारांनी भारतीय कष्टकरी जनसंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राकेश नाकाडे यांचे आभार मानले आहेत.
कामगारांच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी भारतीय कष्टकरी जनसंघ सदैव संघर्षशील राहील, असा विश्वास नाकाडे यांनी व्यक्त केला.