टॉप बातम्या

३५ वर्षांनंतर पुन्हा जुळले मैत्रीचे ऋणानुबंध; आदर्श हायस्कूलच्या जुन्या वास्तूत रंगला स्नेहमिलन सोहळा!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : शाळा सुटली, शिक्षण संपले, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात स्थिरावला; मात्र बालपणीच्या मैत्रीचे बंध कायम राहिले. तब्बल ३५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आदर्श हायस्कूल, मारेगाव येथील सन १९९२ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा रविवार, २२ नोव्हेंबर रोजी शाळेच्या जुन्या वास्तूत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ज्या वर्गखोल्यांमध्ये बालपणीचे दिवस घालवले, त्याच वास्तूत पुन्हा एकत्र येत माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शाळेच्या आवारात पाऊल ठेवताच अनेकांच्या मनात शाळकरी जीवनातील आठवणी जाग्या झाल्या. एकेकाळी वर्गातील बाकांवर एकत्र बसणारे मित्र-मैत्रिणी आज जीवनाच्या विविध क्षेत्रांत स्थिरावले आहेत. मात्र या भेटीत वयाचे आणि काळाचे अंतर जणू विरून गेले. गप्पा, हास्यविनोद आणि जुन्या आठवणींमधून पुन्हा एकदा बालपणीचे दिवस अनुभवण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

या स्नेहमिलन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी चौधरी सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वरारकर सर, निब्राड सर, चुंबळे सर व वरारकर मॅडम उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रा. राजेश घुमे, दयालाल रोगे, मुख्याध्यापक रमेश आत्राम, श्याम घोटेकर, विजय खाडे, इकबाल शेख, शितल गजभिये (चंदनखेडे), माधुरी बदकी (नवले), अर्चना चौधरी (घुमे), कल्पना मते (ठेंगणे) व शोभा कडुकर (लांडगे) यांनी परिश्रम घेतले.

३५ वर्षांनंतरही मैत्रीचा ओलावा कायम असल्याची प्रचिती देणारा हा स्नेहमिलन सोहळा उपस्थितांच्या मनात अविस्मरणीय आठवणींची शिदोरी देऊन गेला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();