सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
मारेगाव : तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील समस्या, अपुऱ्या सुविधा आणि सर्वसामान्य रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी आता रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून एक नवा चेहरा पुढे आला आहे. सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले बद्रूद्दीन काजी भाई यांची मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या कार्यकारी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरोग्यसेवेचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, रुग्णालयातील अपुऱ्या सोयी-सुविधा, औषधांचा तुटवडा, आरोग्य यंत्रणेतील त्रुटी तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन कराव्या लागणाऱ्या गैरसोयींचे प्रश्न अद्याप पूर्णतः सुटलेले नाहीत. अशा परिस्थितीत रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून या समस्यांचा आवाज थेट प्रशासनापर्यंत पोहोचविणे, आवश्यक सुविधांसाठी पाठपुरावा करणे आणि रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देणे, ही महत्त्वाची जबाबदारी आता बद्रूद्दीन काजी यांच्यावर असणार आहे.
त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण रुग्णालयातील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य मिळेल आणि सामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी प्रभावी प्रयत्न होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या निवडीसाठी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही मानले जात आहे.
'पद नव्हे, जनसेवेची संधी!'रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणे, रुग्णांना उपचारासाठी भेडसावणाऱ्या अडचणी दूर करणे आणि गरीब व गरजू रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे बद्रूद्दीन काजी यांनी व्यक्त केले. ही निवड केवळ पदाची जबाबदारी नसून जनसेवेची संधी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बद्रूद्दीन काजी भाई यांच्या निवडीचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

