सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाई केली. मौजा मजरा येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली (क्रमांक MH29-CB4465) महसूल विभागाच्या पथकाने पकडले. काल सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सदर वाहनासह १ ब्रास रेती जप्त करून वाहन मारेगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी वणी नितीनकुमार हिंगोले व उपविभागीय अधिकारी मारेगाव यतीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पथकात ग्राम महसूल अधिकारी भिमराव धोटे, सन्नी कुडमेथे, शैलेश घरडे तसेच महसूल सेवक गणेश उराडे व अमित यांचा समावेश होता.
पकडण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा मालक पुष्पराज प्रमोद गानफाडे असल्याची माहिती पथकाने दिली असून महसूल विभागाच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

