सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात चंद्रपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थासह दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत शुभम संजय वासेकर (वय २४) आणि संजय महादेव वासेकर (वय ५२), दोघेही रा. आनंदनगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १९.२२० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर जप्त करण्यात आली असून, तिची अंदाजित किंमत ४२ हजार २८४ रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS) अंतर्गत कलम ८ (क) व २१ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी अशा अवैध व्यवहारांविरोधात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. अमली पदार्थमुक्त चंद्रपूरसाठी नागरिकांनीही जागरूक राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे.