सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
कोरपना : भारतीय जनता पक्षाची ताकद केवळ पक्षाच्या संघटनात्मक रचनेत नसून तळागाळात सातत्याने काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आहे. सामान्य कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा आधार असून, त्याच्या परिश्रमातूनच संघटना अधिक सक्षम होत असते, असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
कोरपना तालुक्यातील वडगाव येथे गुरुवारी (ता.२) काँग्रेस तसेच शेतकरी संघटनेशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार भोंगळे यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामे आणि लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणे, हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
भाजपच्या सर्वसमावेशक धोरणांसोबतच विकासकामांना मिळणारी गती आणि शासनाच्या विविध योजनांमुळे नागरिकांचा पक्षावरील विश्वास वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. तळागाळातील कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा आणि सरकारची विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे काम करावे, असे आवाहनही आमदार भोंगळे यांनी केले.
३१ कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत:यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आमदार देवराव भोंगळे यांनी पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले. काँग्रेस व शेतकरी संघटनेत कार्यरत असलेल्या या नव्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे वडगाव परिसरातील भाजप संघटनेला बळ मिळणार असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये साहिल पाचभाई, प्रफुल जीवतोडे, प्रशांत मालेकर, आशिष गोहोकर, वैभव आंबेकर, श्रीराम पाचभाई, नरेश राजुरकर, प्रकाश भोंगळे, कार्तिक भोंगळे, श्रीकांत पाचभाई, प्रदीप आंबेकर, ज्ञानेश्वर वडस्कर, सुरज नांदे, विठ्ठल जांभेकर, वैभव गोहोकर, मारोती उरकुडे, नंदकिशोर भोंगळे, गजानन भोंगळे, शशिकांत देवाळकर, भास्कर निखाडे, चंद्रकांत कोलांडे, पांडुरंग मडावी, सतीश भोंगळे, घनश्याम भोंगळे, गोविंदा भोंगळे, विनोद गोहोकर, महेंद्र गोहोकर, चेतन आंबेकर, एकनाथ पाचभाई, विठ्ठल निंदेकर आणि मारोती भोंगळे यांचा समावेश आहे.
नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी आगामी काळात संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे वडगाव परिसरातील स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना सुरुवात झाल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

