सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील शिवणी (धोबे) येथे एका युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २७ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे शिवणी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अनिकेत पदमाकर धाबेकर (३१), रा. शिवणी (धोबे), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अनिकेत यांनी आपल्या राहत्या घरी नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी वणी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शिवणी येथे साडे तीन च्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनिकेत यांच्या नावावर सुमारे तीन एकर शेती असल्याची माहिती आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी मारेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.
या घटनेने शिवणी (धोबे) परिसरात शोककळा पसरली आहे


