सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले असून, उमेदवारी अर्ज दाखल व छानणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज माघारीच्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ३० सप्टेंबर ही अर्ज माघारीची अंतिम तारीख असल्याने त्यानंतर निवडणुकीतील प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे संभाव्य उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठींना सुरुवात झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे अधिकृत प्रचाराला अद्याप वेग यायचा असला, तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा गटातून मारेगाव येथील खरेदी-विक्री संघाचे प्रतिनिधी मारोती गौरकार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर गौरकार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जिल्ह्यातील मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्याची चर्चा आहे. या गृहभेटींमधून मतदारांशी संवाद साधत निवडणुकीच्या दृष्टीने वातावरणाचा अंदाज घेतला जात असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर असल्याने कोण उमेदवारी कायम ठेवतो आणि कोण माघार घेतो, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. माघारीनंतरच निवडणुकीतील प्रत्यक्ष उमेदवार आणि लढतीचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.
त्यामुळे ३० सप्टेंबरनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना अधिक स्पष्ट दिशा मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर प्रचाराला आणखी रंग चढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



