सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : वणी शहरातील लालपुलिया परिसरात असलेल्या कोळसा डेपोमुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असून, नागरिकांच्या आरोग्यावर तसेच जीवितास धोका निर्माण होत असल्याचा आरोप करीत स्माईल फाउंडेशन, वणी यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कोळसा डेपो तातडीने इतर योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, लालपुलिया परिसरात अनेक वर्षांपासून कोळसा डेपो कार्यरत आहे. कोळशाची धूळ, वाहतूक तसेच सातत्याने होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे फाउंडेशनने नमूद केले आहे. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक त्रास होण्याची शक्यता असल्याने याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत असून, वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचा धोकाही वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे लालपुलिया परिसरातील नागरिकांसह वणी शहर व आजूबाजूच्या गावांतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
केवळ पाण्याची फवारणी, रस्त्यांची साफसफाई किंवा वाहतुकीचे नियमन करून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नसून, नागरिकांच्या आरोग्य व जीविताचे रक्षण करण्यासाठी कोळसा डेपोचे कायमस्वरूपी स्थलांतर करणे आवश्यक असल्याचे फाउंडेशनने स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन लालपुलिया परिसरातील कोळसा डेपो इतर योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करावी. तसेच स्थलांतरासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून केलेल्या कार्यवाहीची माहिती अर्जदार संस्थेस लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि जीविताचे रक्षण लक्षात घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी स्माईल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर देविदास जाधव यांनी केली आहे.


