टॉप बातम्या

भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक; २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शहरातील मार्डी चौक ते सरकारी दवाखाना मार्गावर किराणा दुकानासमोर भरधाव स्कूल बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी घडली. रमेश दादाराव मेश्राम (२६, रा. डोंगरगाव, वेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश मेश्राम हा कामानिमित्त मित्राच्या दुचाकीने (एमएच २९ एस ४५१८) मारेगाव येथे आला होता. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास श्रीराम किराणा दुकानासमोर पोहोचला असता, समोरून येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या स्कूल बसने (एमएच २९ बीई १२७४) त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात रमेश गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर नागरिकांनी तातडीने त्याला मारेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी वणी येथील खासगी दवाखान्यामध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रमेश हा रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे ७२ वर्षीय वडील दादाराव मेश्राम आणि कुटुंबीयांनी रुग्णालयात टाहो फोडत सदर घटनेचा तीव्र आक्रोश केला.

स्कूल बसच्या वेगावर नियंत्रणाची गरज
विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बससह इतर वाहनांच्या वेगावर आणि वाहतूक नियमांच्या पालनावर संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची बाब असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर प्रभावी कारवाई होणे आवश्यक आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्कूल बसची नियमित तपासणी, चालकांची जबाबदारी निश्चित करणे आणि शहरातील वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी स्कूल बस चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २८१ आणि १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();