टॉप बातम्या

कॉलवर मित्रांना सांगून नदीत उडी; अथक शोधमोहीमेनंतर तरुणाचा मृतदेह आढळला

संग्रहीत छायाचित्र 

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

घुग्घुस : बेलोरा येथील वर्धा नदीच्या पुलावरून तरुणाने नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्रभर आणि दिवसभर नदीत शोधमोहीम राबवली. अखेर शनिवारी सायंकाळी तरुणाचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.

साबिर अंसारी शेख (वय ३२, रा. श्रीराम वॉर्ड, चांद शाह वली दर्गा परिसर, घुग्घुस) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे १.३० वाजता साबिर बेलोरा येथील वर्धा नदीच्या पुलावर पोहोचला. तेथून त्याने मित्राला व्हिडिओ कॉल करून नदीत उडी मारणार असल्याचे सांगितले. मित्रांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच ते तातडीने पुलाकडे रवाना झाले. ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत साबिरने नदीत उडी घेतली होती.

पुलावर साबिरची मोटरसायकल आणि पर्स आढळून आली. त्यानंतर मित्रांनी तातडीने घुग्घुस पोलिसांना तसेच कुटुंबीयांना माहिती दिली. पोलिसांनी चंद्रपूर येथून आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करून शोधमोहीम सुरू केली.

रात्रीच्या अंधारात आणि नदीच्या वेगवान प्रवाहातही शोध सुरू ठेवण्यात आला. शनिवारी दिवसभर शोधमोहीम राबवल्यानंतर सायंकाळी सुमारे ४.३० वाजता साबिरचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. पथकाने मृतदेह बाहेर काढला.

पोलिस व महसूल प्रशासनाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठवला आहे. साबिरने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी घुग्घुस पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();