टॉप बातम्या

जातनिहाय जनगणनेसाठी वणीत ओबीसींचा एल्गार; शिवतिर्थावर सत्याग्रह आंदोलन

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : ओबीसी समाजाची अचूक व पारदर्शक जातनिहाय जनगणना करण्यात यावी, आगामी जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा तसेच अधिकृत जात यादीच्या आधारे डिजिटल अर्जामध्ये स्वतंत्र ड्रॉप-डाऊन मेन्यूची सुविधा द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना समिती, वणी-मारेगाव-झरीजामणी यांच्या वतीने शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी वणी येथील शिवतिर्थावर शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

महात्मा गांधी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत हे आंदोलन पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात शिक्षक, महिला, युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध समाजघटकांतील नागरिकांनी सहभाग नोंदविला.

अचूक आकडेवारीशिवाय सामाजिक न्यायाची मोजदाद कशी?
ओबीसी समाजाची लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक स्थिती तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिनिधित्व याबाबत योग्य धोरणे आखण्यासाठी जातनिहाय अचूक आकडेवारी आवश्यक असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. समाजाची वास्तविक लोकसंख्या आणि सामाजिक परिस्थितीची अचूक माहिती उपलब्ध नसेल, तर सामाजिक न्यायाशी संबंधित योजनांचे नियोजन आणि त्याचे मूल्यमापन कसे होणार, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

सन २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात जनगणनेतील जात नोंदणीच्या प्रक्रियेमुळे विविध नोंदी, स्पेलिंगमधील चुका आणि पोटजातींच्या वेगवेगळ्या नोंदी यामुळे विसंगती निर्माण झाल्याचा मुद्दाही समितीने मांडला.

भविष्यातील जनगणनेत अशा त्रुटींना आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अधिकृत OBC यादीनुसार डिजिटल पद्धतीने जात नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी अर्ज भरताना अधिकृत जात यादीवर आधारित ड्रॉप-डाऊन मेन्यू उपलब्ध करून दिल्यास नोंदी अधिक प्रमाणित आणि अचूक होण्यास मदत होईल, अशी भूमिका समितीने व्यक्त केली.

गांधी-शास्त्री जयंतीदिनी लोकशाही मार्गाने आंदोलन
महात्मा गांधी यांच्या अहिंसा व सत्याग्रहाच्या विचारांना अनुसरून आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने करण्यात आले. तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.

ओबीसी समाजाच्या जातनिहाय आकडेवारीचा प्रश्न केवळ जनगणनेपुरता मर्यादित नसून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि प्रशासकीय धोरणांशी संबंधित असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे संविधानिक व लोकशाही मार्गाने या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

आंदोलनाचे संचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले. रघुनाथ कांडारकर यांनी प्रास्ताविकातून आंदोलनाची भूमिका आणि प्रमुख मागण्यांची माहिती दिली. गोविंद थेरे, मोरेश्वर वासेकर, नितीन मोहितकर, निलिमा काळे आणि मायाताई आसूटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटी नारायण मांडवकर यांनी आभार मानले.

महिला, युवकांसह विविध समाजघटकांचा सहभाग
सत्याग्रह आंदोलनात महिला, युवक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध समाजघटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीला पाठिंबा देत शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी मोहन हरडे, गजानन चंदावार, प्रदीप बोरकुटे, नारायण मांडवकर, सुरेश राजूरकर, अजय चन्ने, सविता रासेकर, सरिता पिंपळकर, रुपाली मोवाडे, निलिमा काळे, माया आसूटकर, हर्षदा मोवाडे, कविता राजूरकर, सुरेखा हरडे, निशा ढूमणे, मनीषा आवारी, अर्चना झाडे, शितल माटे, गजेंद्र भोयर, गुलाब वांढरे, भैयाजी पिंपळकर, लक्ष्मण ईद्दे, विलास गवारकर, जगदीश ढोके, किशोर ओचावार, मोरेश्वर वासेकर, अशोक चौधरी, शामराव घुमे, रघुनाथ कांडारकर, पांडुरंग पंडिले, रमेश येरणे, तानाजी पाऊणकर, रविंद्र राऊत, विनोद माहुरे, गोविंद थेरे, राजू पिंपळकर, राकेश बरशेट्टीवार, अशोक गौरकर, विजय गौरकर, नितीन मोहितकर, दिवाकर नरुले, उद्धव हेपट, शाम बोढे, रविंद्र कुर्ले, गजानन तुरारे, प्रकाश रिंगोले, राजेंद्र देवतळे, नंदप्रकाश खाडे, विनोद राजूरकर, किशोर परसावार, रविंद्र आंबटकर, सुरेंद्र बुच्चे, वैभव ठाकरे, अनिल टोंगे, अशोक खामनकर, दिलीप खामनकर, गुलाब आवारी, पांडुरंग कवरासे, नाना महाकुलकर, भास्कर सोमलकर, राजेश बोकडे, मारोती मोडक, वामन नक्षिणे, दत्तू महाकुलकर, काशिनाथ बुच्चे, शैलेश अडपावर, परिमल अंड्रस्कर, महेश खामनकर, विजय दोडके, आनंद घोटेकर, मंगेश खामनकर, राजेश बोकडे, वैभव येरगुडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

जातनिहाय अचूक जनगणना, स्वतंत्र कॉलम आणि डिजिटल पद्धतीने प्रमाणित जात नोंदणी या मागण्यांसाठी आगामी काळातही संविधानिक व लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();