टॉप बातम्या

हिंदी चित्रपट गीतांत दडले जीवनाचे तत्त्वज्ञान; डॉ. प्रसाद खानझोडे यांचा वेध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : हिंदी चित्रपटांतील गीते ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून जीवनाचे तत्त्वज्ञान, संघर्षातून मार्ग काढण्याची प्रेरणा आणि आत्मबोध मिळतो, असे प्रतिपादन डॉ. प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी केले. नगर वाचनालय वणी आणि विदर्भ साहित्य संघ, वणी शाखेच्या वतीने आयोजित ‘माझं गाव, माझा वक्ता’ व्याख्यानमालेच्या ६१ व्या पुष्पात ‘हिंदी चित्रपट गीतातील बोध’ या विषयावर ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ, वणी शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अभिजित अणे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार उपस्थित होते. कन्या दिनानिमित्त विजय गंधेवार यांनी गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी नगर वाचनालयातील कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकातून गजानन कासावार यांनी ‘माझं गाव, माझा वक्ता’ या व्याख्यानमालेचा इतिहास उलगडून सांगितला. 
       

डॉ. खानझोडे यांनी हिंदी चित्रपट गीतांमधील जीवनमूल्यांचा विविध उदाहरणांसह वेध घेतला. भारतीय नागरिकांच्या मनावर हिंदी चित्रपट गीतांनी दीर्घकाळ प्रभाव टाकला असून, मनोरंजनातूनही आत्मबोध होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. भारतीय तत्त्वज्ञानातील गहन विचार अत्यंत सोप्या भाषेत हिंदी चित्रपट गीतांतून मांडले गेले आहेत.

‘रुक जाना नहीं’ या गीताचा संदर्भ देत जीवनात कितीही अडचणी आल्या तरी थांबून न जाता संघर्षातून मार्ग काढत पुढे जात राहण्याचा संदेश मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना आपण सुरक्षितता आणि आनंद देऊ शकतो का, याचा विचार प्रत्येकाने करावा. त्यातून चांगल्या माणसांची साखळी निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

श्रीमद्भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील ‘स्वतःचा उद्धार स्वतः करावा’ या विचाराचा संदर्भ देत त्यांनी मेणबत्ती स्वतः वितळून प्रकाश देते, तर बर्फ स्वतः वितळून थंडावा देतो; त्याप्रमाणे आपले जीवन इतरांसाठी उपयोगी ठरणारे असावे, असा संदेश दिला.

 संघर्षाच्या काळात माणसामध्ये जे संस्कार व विचार भरलेले असतात, तेच बाहेर येतात. सुख-दुःख हे जीवनातील अपरिहार्य भाग असून विचारांच्या प्रदूषणापासून स्वतःला वाचविण्यासाठी विवेकाचे आवरण आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

‘मैं पल दो पल का शायर हूँ’ या गीताचा दाखला देत यश, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी ही कालसापेक्ष असते, त्यामुळे वर्तमानात जगण्याचे महत्त्व ओळखले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्यांकडून अवाजवी अपेक्षा न ठेवता प्रत्येकाला तो जसा आहे तसा स्वीकारणे, तसेच निंदा-स्तुतीचा मनावर विपरीत परिणाम होऊ न देणे, हा हिंदी चित्रपट गीतांचा जीवनाला मिळणारा महत्त्वाचा बोध असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. अभिजित अणे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतांचा मागोवा घेत, या गीतांनी अनेकांच्या जगण्याला नवीन बळ आणि दिशा दिल्याचे प्रतिपादन केले.
  सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाच्या वणी शाखेचे उपाध्यक्ष अशोक सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाचे आभार गजानन भगत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर वाचनालयाचे देवेंद्र भाजीपाला, प्रमोद लोणारे, कल्पना राठोड आणि राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();