सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे महाराष्ट्र भूषण व पद्मश्री अशोक सराफ यांच्या 80 व्या वर्षात पदार्पण निमित्ताने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून सर्वांना मराठी सिनेमाची गोडी लावली आणि मराठी सिनेमाला एक उंची व लोकाभिमुखता दिली. अशोक सराफ यांचा अभिनय अत्यंत सहज आहे त्यात कुठलीही कृत्रिमता जाणवत नाही, सहजतेने त्यांनी प्रत्येक भूमिका साकारली.
मराठी माणूस हा वास्तवात जगणारा आहे, त्यामुळे अशोक सराफ यांनी साकारलेल्या नायकामध्ये मराठी माणसाला स्वतःचे अस्तित्व दिसले आणि म्हणूनच अशोक सराफ हे खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनातील सुपरस्टार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
हास्यरस आणि त्याची पद्धत बदलत गेली, या सर्व गोष्टींना एक वेगळे वळण देण्याचे काम अशोक सराफ यांनी केले. टीव्हीवरील ‘हम पाँच’सारख्या मालिकांमध्ये सहजतेने हास्यरस निर्माण होणे हे पाहायला मिळायचे. त्यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही भरपूर काम केले. हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले, तसेच नाटकांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीची सेवा केली. उत्तम कलावंतच नव्हे, तर उत्तम माणूस म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहू शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार संदीप जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.