टॉप बातम्या

वणी: वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी; मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे निवेदन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणीवणी शहरात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधत मानवी हक्क सुरक्षा परिषद (ट्रस्ट)च्या वतीने मंगळवारी (दि. ७ जुलै २०२६) वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नरेश रनधिर यांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या गांधी चौकातील मोठी कमान परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून चारचाकी वाहने, ऑटोरिक्षा आणि वाढत्या वाहनांच्या वर्दळीमुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच आपत्कालीन सेवांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर गांधी चौकातील मोठी कमान ते टूटी कमान या मार्गावर चारचाकी वाहने व ऑटोरिक्षांच्या प्रवेशावर वेळेनुसार निर्बंध घालावेत किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आगामी गणेशोत्सव व दुर्गोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन व प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरजही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय, सकाळी १० ते दुपारी ३ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या गर्दीच्या वेळेत गांधी चौक परिसरात नियमित दोन अतिरिक्त वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनावर मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू धावंजेवार, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख परशुराम पोटे, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानपाटे, यवतमाळ जिल्हा प्रथम संपर्कप्रमुख सौ. सुमित्रा गोडे, महिला उपाध्यक्षा मनिषा निब्रड, यासह भाऊसाहेब आशुटकर, अजय चन्ने, सौ. सुनिता काळे, सौ. प्रमिला चौधरी, सुरेश बन्सोड, संजय चिंचोलकर, आकाश दुबे तसेच अमोल कुमरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();