टॉप बातम्या

यवतमाळ जिल्हा पीक विमा योजनेतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा योजनेतून वगळण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी, वणी यांच्या मार्फत देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून येथील बहुतांश शेतकरी नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून आहेत. दरवर्षी अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीड व रोग यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाची पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत होती.

मात्र, यवतमाळ जिल्ह्याला या योजनेतून वगळण्यात आल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असताना यवतमाळचा अपवाद का करण्यात आला, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे. आणेवारी ५० पैशांच्या आत असतानाही जिल्ह्याला विम्यापासून वंचित ठेवणे हे प्रशासनाचे अपयश असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तसेच, जिल्ह्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिक गंभीर बनली आहे. १ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची तर जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ६४ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची अधिकृत नोंद असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे सुरक्षाकवच असल्याने यवतमाळ जिल्ह्याचा तात्काळ पुनर्विचार करून पुन्हा या योजनेत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी, जगदीश चौधरी, अशोक पांडे, प्रफुल उपरे, अरुण नागतुरे, मोरेश्वर वासेकर, दादाराव चटप, सूर अशोक चिकट आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();