सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : महाराष्ट्राची अस्मिता मानली जाणारी पारंपरिक लोककला लावणी रविवारी सायंकाळी ६ वाजता अभूतपूर्व उत्साहात साकारली गेली. सोमय्या ग्रुप of इन्स्टिटयूट यांच्या पुढाकाराने आणि संचालक पी. एस. आंबटकर यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाने चंद्रपूर शहराच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णक्षणांची भर घातली.
या ऐतिहासिक सोहळ्यात विविध शाळा व संस्थांमधील तब्बल २,७०० विद्यार्थिनी व महिलांनी एकत्र येत ७ मिनिटे ३० सेकंदांच्या कालावधीत सलग ७ लावणी नृत्यांचे सुसंवादी सादरीकरण केले. पारंपरिक नऊवारी साड्यांतील देखणेपणा, ठसकेबाज हालचाली आणि तालावरची अचूक पकड यामुळे संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला. शिस्तबद्ध नियोजन, वेळेचे काटेकोर पालन आणि नेत्रदीपक मांडणी यामुळे या कार्यक्रमाने विश्वविक्रमाची नोंद प्रस्थापित केली.
या विक्रमाची दखल तब्बल १८० देशांमध्ये घेतली जात असून, चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. लोककलेला जागतिक स्तरावर नेण्याचा हा प्रयत्न सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा देणारा ठरला.
यावेळी बोलताना संचालक पी. एस. आंबटकर यांनी सांगितले की, “महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला जागतिक व्यासपीठ मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. भविष्यातही अशा सांस्कृतिक उपक्रमांतून राज्याची ओळख अधिक भक्कम केली जाईल.”
या भव्य लावणी महोत्सवाने चंद्रपूरच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवला आहे.

