टॉप बातम्या

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज; मारेगाव तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर"

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी आणि महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर – टप्पा १” अंतर्गत मारेगाव तालुक्यात मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन आज शनिवार दिनांक 7 मार्च पासून सुरुवात करण्यात येत आहे. 

लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना पुढे ठेवत नागरिकांच्या दैनंदिन तक्रारींचे एकाच ठिकाणी तात्काळ निवारण करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरांद्वारे महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना थेट उपलब्ध करून देत प्रशासन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे तहसीलदार उत्तम निलावाड मारेगाव यांनी सांगितले.

तालुक्यातील मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
७ मार्च : मार्डी
१४ मार्च : वनोजा
१० एप्रिल : जळका
१७ एप्रिल : कुंभा
१५ मे : मारेगाव

या शिबिरांमध्ये नागरिकांना विविध महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, ७/१२ उताऱ्यातील चुका दुरुस्ती करणे, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे देणे, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती देणे आदी सेवांचा समावेश आहे.

याशिवाय सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंदर्भातील प्रकरणांचा निपटारा, परांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज स्वीकृती, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्याची प्रक्रिया देखील पार पडणार आहे.

सदर शिबिरांमध्ये नगर परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग तसेच इतर शासकीय विभागांच्या सेवा देखील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नागरिकांनी आपल्या मंडळातील शिबिराच्या दिनांकापूर्वी आवश्यक सेवेबाबतचे अर्ज संबंधित ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();