दिनविशेष : गोंडवानाची राणी दुर्गावती !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राणी दुर्गावती यांची आज ५ ऑक्टोबर रोजी ५०० वी जयंती आहे. राणीच्या सत्तेखालील दिवस म्हणजे गोंडवाना राज्याचा सुवर्णकाळ होता, असे म्हटले जाते.

दलपत याच्याशी दुर्गावतीचे लग्न झाले. त्यांना मुलगा झाला त्याचे नाव वीर नारायण होते. दुर्दैवाने वीर नारायण चार वर्षांचा असतानाच दलपतचा मृत्यू झाला, पण राणी दुर्गावती डगमगली नाही, छोट्या वीर नारायणचा राज्याभिषेक केला आणि त्याच्या नावाने ती स्वतः राज्यकारभार करू लागली.
चितोड, मेवाड, गोंडवाना अशी काही राज्ये सोडली तर आजूबाजूला सगळी मुघल राज्ये होती. आता हे राजे आपले राज्य बळकावण्याचा प्रयत्न करतील याची तिला कल्पना होती, म्हणून तिने सर्वप्रथम सैन्याची फेररचना केली. २० हजार घोडेस्वार १ हजार हत्ती व मोठ्या प्रमाणावर पायदळ होते. त्यामध्ये महिला सेनेचाही अंतर्भाव होता. याशिवाय ५२ गड तिच्या ताब्यात होते. माळवा प्रदेशातील बहादूर शहा आणि मीआणा अफगाण यांचा पराभव केल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. ती उत्तम प्रशासक होती. राज्यात सर्व स्थरांतील लोकांमध्ये तिचा वावर असे. प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेत असे. जेव्हा तिने शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या, तेव्हा राज्यामध्ये अनेक ठिकाणी विहिरी आणि तलाव याचे बांधकाम केले. त्यामुळे राज्यामध्ये पाण्याची कमतरता कधीच जाणवली नाही. अजूनही जबलपूरमध्ये राणी तालाब, आधार तालाब, चौरी तालाब आपल्याला पाहायला मिळतात. असे म्हणतात तिचे राज्य इतके समृद्ध होते की प्रजा सुवर्ण मुद्रांमध्ये किंवा हत्तीच्या रूपात कर देत असे.

राणी दुर्गावती जणू काही सर्वगुणसंपन्न होती, रुपवती होती तितकीच बुद्धिमान होती. तिच्या राज्यात कला व साहित्य क्षेत्रासाठी चांगले दिवस होते. तिच्या दरबारात मेगा सिंह उईका, छन्ना सिंह मडावी, पद्मनाभ भट्टाचार्य असे विद्वान होते, ज्यांनी दुर्गा मां, यायल, गोंडवाना वारी, दुर्गावती विलास समयालोक, वीरचंपू अशा साहित्य रचना केल्या. महेश ठाकूर, रघुनंदन दामोदर ओझा, भाव सिंह, राजनेगी असे अनेक कवी तिच्या दरबारात होते. लहानपणी अनेक वेळा ती राजकुमाराच्या वेशात शिकारीला जात असे. तसेच स्वतः राज्य करताना पुरुष वेशात फिरत असे, लढाईच्या वेळीसुद्धा पुरुष वेश परिधान करत असे.
अशा रूपवान, कर्तबगार दुर्गावती राणीचे सर्वत्र कौतुक होत होते. तिची कीर्ती अकबर बादशाहपर्यंत पोहोचली. एक स्त्री असून अशी कारकीर्द करणाऱ्या विरांगनेला अकबराने प्रस्ताव पाठविला की, राणीने आपला प्रिय सफेद हत्ती व आपला विश्वासू अधिकारी वजीर आधार सिंह यांना भेट म्हणून पाठवावे. राणीने अर्थातच हा प्रस्ताव धुडकावून लावला. आणि १५६४ मध्ये युद्धाला सुरुवात झाली. अकबराने आपल्या आसिफ खान नावाच्या सरदाराला राणी विरोधात युद्ध करण्यासाठी पाठविले. पहिले युद्ध युद्ध सिरमौर पासून उत्तरेला काराबाग येथे झाले, दुसरे युद्ध सीरमौर येथे झाले व तिसरे युद्ध गड मांडला मध्ये झाले. या तिन्ही युद्धात आसफखान पराजित झाला. चौथे युद्ध नर्रई मध्ये झाले. हे क्षेत्र दुर्गम डोंगरांचे होते, डोंगरांमध्ये मोठा नाला होता, एके रात्री या नाल्याचा बांध आसफखानच्या सेनेने तोडला. त्यामुळे दुथडी भरून वाहाणारा नाला राणीच्या सेनेला पार करता येईना. आसफखान जवळ मोठे सैन्य होते तर राणीकडे मात्र जेमतेम पाचशे सैनिक होते. हिंमत न हरता राणी त्वेषाने लढू लागली. ते पाहून सैनिकांचे पण मनोबल वाढले व त्यांनी निकराचे युद्ध सुरू केले. पण यावेळी राणीला बाण लागून ती जखमी झाली. तेव्हा तिने आपल्या विश्वासू सैनिकाला आपला वध कर म्हणून सांगितले. पण त्या सैनिकाला हिंमत होईना, त्याचे हात थरथरू लागले. तेव्हा शत्रूच्या हातून मरण येऊ नये म्हणून राणीने स्वतःच्या कट्यारीने स्वतःच स्वतःला मारले, राणी दुर्गावती शहिद झाली. साधारण पंधरा वर्षे तिने राज्य कारभार चालविला. जबलपूर जवळ नरंई गावाजवळ तिची समाधी आहे. वयाच्या ४० व्या वर्षी तिला मृत्यू आला.
दिनविशेष : गोंडवानाची राणी दुर्गावती ! दिनविशेष : गोंडवानाची राणी दुर्गावती ! Reviewed by सह्याद्री चौफेर on October 05, 2024 Rating: 5
Powered by Blogger.