खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्यात!

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

मारेगाव : सतत नापिकीशी संघर्ष करत असताना शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. आता खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पेरणीसाठी लागणारे बियाणे व खते खरेदीसाठी पैसा आणायचा कुठून, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात दुष्काळाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हाततोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतातून माल घरात आला. मात्र, त्यातून लागवडखर्चही निघू शकला नाही. खरिपातील नुकसान भरून
काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कंबर कसली. एक हंगाम साथ देईल, या आशेवर जगत असताना शेतकऱ्यांची वारंवार निराशाच होत आहे. शेतीत राबताना कामात रात्रंदिवस कित्येकांना बाधा झाली, काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, आणि शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. काही शेतकऱ्यांना मदत मिळाली ती कवडीमोल. औषधोपचारावर खर्च करावा लागला. त्यातून बरे झालेल्यांचे पाऊल खरीप हंगामाच्या लागवडीकडे वळले. हातात पैसा नसल्याने पीककर्ज मिळविण्यासाठी शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवीत आहेत. राष्ट्रीयीकृत बँका दरवर्षीप्रमाणे पीककर्ज वाटपात आखडता हात घेत आहेत. दरवर्षीचा अनुभव बघता शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारात जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणीच्या वेळी पैसा उपलब्ध न झाल्यास खते व बी-बियाण्यांसाठी कुठून तजवीज करावी, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जात बुडाले. 
एकही हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे शिल्लक पडत नाहीत. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. आता खरीप हंगामासाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न आहे. बँकांकडून वेळेवर पीककर्ज मिळत नाही. अशा परिस्थितीत राज्य व केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज देऊन दिलासा द्यावा.
खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्यात! खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्यात! Reviewed by सह्याद्री चौफेर on June 01, 2024 Rating: 5
Powered by Blogger.