सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे
वरोरा : निसर्ग आणि मानव यांचा अन्योन्य संबंध आहे. आदिकाळात माणूस जंगलाच्या सानिध्यात राहिला आणि जंगलाच्या सोबतीनेच जगाला. सध्या या जंगल संस्कृतीपुढे वेगवेगळी आव्हाने उभी ठाकली आहेत. ही संस्कृती संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे थांबवायचे असेल तर आदिवासी भागातील जल, जंगल आणि जमीन कवितेच्या केंद्रस्थानी यायला हवीत असे उद्गार गडचिरोली येथील सुप्रसिद्ध कवयित्री मालती मडावी सेलमे यांनी काढले.
शेगांव (बु) ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरी कवितेवर बोलू काही या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संवादक म्हणून प्रसिद्ध कवयित्री गीता रायपुरे देव्हारे यांनी भूमिका पार पाडली. अध्यक्षस्थान चंद्रपूरचे कवी प्रदीप देशमुख यांनी भुषविले. याप्रसंगी बदलापूर येथील प्रसिद्ध समीक्षक डॉ. संदीप भेले, कवितेच्या घराचे कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे, खेमजई येथील उपसरपंच चंद्रहास मोरे, कवी विवेक पत्तीवार उपस्थित होते. कवितेविषयी गीता देव्हारे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मालती सेलमे म्हणाल्या, जंगलची संपत्ती गोळा करीत आम्ही वाढलो, झाडे, झुडपे, जंगल, वेली हे सर्वच आमच्या सगेसोयऱ्यांसारखेच आहेत. आमच्या भागात सोईसुविधा नसल्यामुळे खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. आज आम्ही शहरात राहतो. नागरी जीवन व त्यातील धुसमट पाहून मन दुःखित होते. असे सांगून त्यांनी आदिवासी संस्कृतीची विविध वैशिष्टये सांगितली. या प्रसंगी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी निसर्गाचा वेध घेणाऱ्या विविध कविता सादर केल्या. 'ह्या हिरव्या पांदणवाटा ओढती माझे पाय', पावसा ये जरा जरा, संविधान गीत, रमाईचे महात्म्य सांगणारी कविता, बालमनाच्या वेध घेणाऱ्या कविता अशा अनेक कविता सादर करून मुलाखतीत रंगत आणली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे चंद्रहास मोरे म्हणाले, कवीने सामाजिक भान ठेवून कवितेतून प्रकट झाले पाहिजे, समाजाला सोडून कवितेचा विचार होऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी कवितेच्या घरातील विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमोद नारायणे यांनी केले, तर आभार डॉ. संदीप भेले यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाला विकास अधिकारी विद्याधर वैद्य, खेमजई येथील ग्रामपंचायत सदस्य धनराज गायकवाड, कवी राजू मांडवकर उपस्थित होते.
यशस्वितेसाठी कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर, संकल्पनाकार किशोर पेटकर, सूर्यकांत पाटील, भारत रामटेके, माविम सहयोगीनी रंजू रामटेके, वनिता माकोडे, गीता फुलकर, सावित्री सीएमआरसी सचिव वंदना वाढई , सुधा भोज, मंदाताई वैद्य, प्रियंका नागदेवते, विकास ग्रुपचे अमोल दातारकर, धर्मराज लोडे तसेच सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आदिवासी भागातील जल, जंगल, जमीन कवितेच्या केंद्रस्थानी यावेत- मालती सेलमे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 29, 2023
Rating:
