दिवाळी मध्ये शेतकऱ्यांच्या घरी आलेला कापूस होळी झाल्यावरही घरीच; योग्य भाव नसल्याने उत्पादक शेतकरी फोडताहेत टाहो...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : कापसाला योग्य भाव नसल्यामुळे काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात साठवून ठेवला आहे,मात्र आवकाळी पावसाचे संकट त्यास भयग्रस्त करत आहे,कापसाला योग्य भाव नसल्याचे सुल्तानी संकट आणि अवेळी आवकाळी पावसाचे आस्मानी संकट अशा दुहेरी संकटात सध्या बळीराजा सापडला असल्याचे दिसून येत आहे.

कापूस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नगदी पीक.यावर्षी कापसाला मुहूर्तावर निघालेला १० ते १२ हजारांचा भाव तसेच मागील वर्षी मिळालेल्या १२ ते १३ हजारांच्या भावामुळे कापूस उत्पादकांना चांगल्या भावाची अपेक्षा लागली होती.असे असतानाच डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे कापसाच्या दरात सुमारे तीन ते साडेतीन हजारांची घट झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.दरात घट झाल्याने उत्पादकांनी पांढरे सोने घरात साठवून ठेवलेआहे.

या वर्षी मारेगाव तालुक्यासह जिल्ह्यात कापसाचे उत्पादन कमी असल्यामुळे प्रतिक्विंटल १० ते १२ हजारांपर्यंत भाव मिळण्याची अपेक्षा होती.कापसासाठी लागणारा खर्च व सध्या मिळणारा ८ हजारांपेक्षा कमी भाव या बाबी पाहता शेतकऱ्यांना हा भाव परवडणारा नसल्याची खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या भावात सतत अस्थिरता दिसुत येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. या ठिकाणी बाकीच्या इतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भावापेक्षा ५०० रुपये कमी दरात कापूस खरेदी करताना दिसुन येते आहे.मारेगाव येथे खरेदीदार लोकांची साखळी असून कापसाची खरेदी किंमत संगनमताने ठरवत असल्याचे जाणवत आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असतांना मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोरणांमुळे आज शेतकऱ्यांना ५०० रुपये कमी भावाने आपल्या कापसाची विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या चालु वर्षातील मार्च महिना संपत आला आहे,बँकेचे व्यवहार म्हणजेच अनेक शेतकऱ्यांनी बँक व सोसायटीकडून शेतीसाठी घेतलेले पीककर्ज आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करावे लागतात तसेच लग्नसमारंभ जवळ आले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरात मुला-मुलींच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे. आता गरजेमुळं शेतकऱ्यांना आपला कापूस बाजारात आणवे लागत आहे आणि मिळेल त्या भावात कापसाची विक्री विकावी लागत आहे, कारण घरात कापूस असल्याने चिंता वाढली आहे.

कापसाचे योग्य भाव मिळत नाही, सरकारचे धोरणही शेतकऱ्यांच्या विरोधात दिसून येत आहे,आता भाव वाढण्याची अपेक्षा उरलेली नाही.कमी भावात कापूस विकल्यास तोटा होईल.सध्या तरी यावर उपाय नाही.सरकारने यावर उपाययोजना करावी अन्यथा अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.याची तात्काळ शासनस्तरावर नोंद घेतली जावी असा नाराजीचा सुर कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून निघत असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळी मध्ये शेतकऱ्यांच्या घरी आलेला कापूस होळी झाल्यावरही घरीच; योग्य भाव नसल्याने उत्पादक शेतकरी फोडताहेत टाहो... दिवाळी मध्ये शेतकऱ्यांच्या घरी आलेला कापूस होळी झाल्यावरही घरीच; योग्य भाव नसल्याने उत्पादक शेतकरी फोडताहेत टाहो... Reviewed by सह्याद्री चौफेर on March 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.