सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : नुकत्यात पार पडलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आज मतमोजणी सुरू झाली आणि दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झाले. मारेगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत सरपंच,सदस्य पदाकरिता 18 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यात वेगाव, मार्डी, वनोजा, हिवरी, कोसारा, कानडा, नवरगाव, गौराळा, शिवणी या नऊ ग्रामपंचायत करीता निवडणूक घेण्यात आली. आज मंगळवार 20 डिसेंबर रोजी मतदान मोजणी प्रक्रिया पार पडुन निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. 9 पैकी 5 जागांवर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले.
आज मंगळवारी निकाल लागला. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तालुक्यातील मोठी व प्रतिष्ठित ग्रामपंचायत असलेल्या वेगाव येथे सरपंच पदाकरिता उषा अनिल देरकर विजयी झाल्या. त्या काँग्रेस प्रणित पॅनल कडून उमेदवार होत्या. मार्डी येथे सरपंच पदाकरिता रविराज चंदनखेडे विजयी झाले. काँग्रेस प्रणित पॅनल कडून उमेदवार होते. वनोजा येथे सरपंच पदाकारिता डीमन गोवर्धन टोंगे विजयी झाल्या. त्या शिवसेना (ठाकरे) महिला उपजिल्हा संघटिका आहे. हिवरी येथे सरपंच पदाकरिता इंदिरा पिदूरकर विजयी झाल्या. त्या काँग्रेस प्रणित पॅनल कडून उमेदवार होत्या. कोसारा येथे सरपंच पदाकरिता छाया अंकुश खाडे विजयी झाल्या. त्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलच्या उमेदवार होत्या. कानडा येथे सरपंच पदाकरिता सुषमा रुपेश ढोके विजयी झाल्या. त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रणित पॅनल कडून उमेदवार होत्या. नवरगाव येथे सुचिता फुलू कुमरे विजयी झाल्या. गावकरी पॅनल कडून उमेदवार होत्या. गौराळा येथे सरपंच पदाकरिता मयुरी चंद्रकांत धोबे विजयी झाल्या. त्या ग्रामविकास पॅनल कडून उमेदवार होत्या. शिवणी येथे सरपंच पदाकरिता निलेश रासेकर विजयी झाले. ते महाविकास आघाडीच्या पॅनल कडून उमेदवार होते.
सरपंच पदी विजयी झालेल्या पॅनल मधुन बहुतांश सदस्य निवडून आले आहेत. या निवडणुकीकारिता निवडणूक निर्णय अधिकारी संदीप वाघमारे, सुधाकर जाधव, आर. डी कांडळकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी करण कुडमेथे, विवेक राऊत, किरण मेश्राम यांनी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार दिपक पुंडे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
या निवडणुकीत "कुठे खुशी तर कुठे गम " असे चित्र पाहावयास मिळत आहे.