टॉप बातम्या

झरी-जामणीत क्रीडा संकुलासाठी रस्ता रोको

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी-जामणी : तालुक्याच्या मुख्यालयात क्रीडा संकुल उभारण्याच्या मागणीसाठी झरी-जामणी येथे सोमवारी क्रीडा संकुल बचाव समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर प्रशासनाशी झालेल्या चर्चेत मुख्यालय क्रीडा अंगणासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलनाची सांगता करण्यात आली.

रस्ता रोकोनंतर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसीलदारांच्या दालनात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीस माजी आमदार संजीवरेड्डी बोतकुलवर उपस्थित होते. झरी-जामणी नगरपंचायत मुख्यालयासाठी मुख्यालय क्रीडा अंगण मंजूर करण्यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवून सकारात्मक पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिली.

तालुक्याचे क्रीडा संकुल झरी-जामणी येथेच उभारण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यापूर्वीही या मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी क्रीडा संकुल झरी-जामणी येथेच उभारण्यात येईल आणि सातबारा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते.

बैठकीत पाटण ग्रामपंचायतीच्या क्रीडा संकुलाचा आणि झरी-जामणी नगरपंचायत मुख्यालयातील प्रस्तावित क्रीडा संकुलाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पाटणचा विषय स्वतंत्र असून, तालुक्याचे मुख्यालयीन क्रीडा संकुल झरी-जामणी येथेच उभारण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून, आता आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवून मंजुरीची प्रक्रिया कितपत वेगाने पूर्ण होते, याकडे झरी-जामणी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();