सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : तालुक्यात मागील काही दिवसापासून वाघांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे वाघ वन्यजीव तर गिळू लागलेच मात्र, आता नरभक्षी झाले असून त्यांच्या हल्ल्यात निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. गाव खेड्यालगत असलेल्या जंगलव्याप्त भागात वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे. अनेकांना या वाघांचे दर्शन सुद्धा झालेले असताना ब्राह्मणी या गावात टॉवर चे काम करणाऱ्या मजुरावर वाघाने हल्ला केल्याची घटना ताजी असतांनाच आज गुरे चराईचं काम करणाऱ्या इसमावर झडप घेत त्याचा जीव घेतला. पहाटेच्या सुमारास कोलेरा गावा जवळील जंगलव्याप्त भागात ही घटना उघडकीस आली. त्याचं अर्ध शरीरचं वाघाने फस्त केलं होतं. रामदास जगन्नाथ पिदूरकर रा. कोलेरा (वय अंदाजे ६५ वर्ष) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. रामदास हे नेहमी प्रमाणे काल (२७ नोव्हेंबर) ला गुरे चारण्यासाठी घेऊन गेले होते. परंतु रात्री उशिरा पर्यंत जनावरं राखण करणारे गुराखी पिदूरकर घरी न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोधाशोध घेण्यात आला. जंगलव्याप्त भागातही गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. पण रात्र असल्याने शोध कार्य थांबवावं लागलं. आज सकाळी गावकऱ्यांनी परत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावापासून काही अंतरावरच जंगल भागात झुडपाआड त्यांचा वाघाने अर्धे शरीर फस्त केलेला मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. दिवसेंदिवस वाघांचे हल्ले वाढले असून तालुक्यातील गावकरी भीतीच्या सावटात आले आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष होण्यापूर्वी या वाघांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
गुराख्यावर वाघाची झडप, चराई करिता घेऊन गेलेला इसम वाघाच्या हल्ल्यात ठार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 28, 2022
Rating:
