चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : दारव्हा तालुका वन्यप्राणी व मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. जंगलातील फळझाडे पूर्णतः नष्ट झाल्यामुळे जंगलातील प्राणी गावाच्या दिशेने येत आहेत. यामुळे जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात फळवगीय झाडांची लागवड करणे अत्यावश्यक बाब झाली आहे.
जंगलामध्ये फळवगीय झाडांची कमतरता असल्याने जंगलात राहणारे वानर (माकड) हरिण, डुक्कर, यासारखे प्राणी गावाकडे, शेताकडे येऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. माकडांच्या हैदोसाने घराघरामधील फळझाडांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे प्राणी वाघ, बिबट या सारख्या हिंस्त्र प्राण्यांचे भक्ष्य ठरत आहेत. भक्ष्यांचा मागोवा घेत वाघ आणि बिबट गावाच्या दिशेने येऊन गावखेड्यात दहशत निर्माण करीत आहेत. पर्यायाने वन्यप्राणी व मानव संघर्ष वाढीला लागला आहे. हा संघर्ष थांबवून पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर जंगलामध्ये फळवगीय झाडांची लागवड करणे अत्यावश्यक आहे. फक्त झाडे लावूनच होणार नाही तर त्यांची जोपासना योग्य पद्धतीने करून किमान पाच ते दहा वर्षांपर्यंतं संगोपन करण्याचीही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. वन विभागाने मागील अनेक वर्षांपासून केवळ इमारती लाकूड मिळविण्याच्या दृष्टीनेच झाडांची लागवड केली आहे. त्यात सागवन, सिसम, बीजा यासारख्या बहुतेक झाडांचा समावेश आहे. डुकरांसाठी कंदमुळे, हरिण आणि इतर प्राण्यांसाठी पालावगीय झाडे लागवडीची नितांत आवश्यकता आहे.
महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. त्यात इमारती लाकूड मिळणाऱ्या झाडांची संख्या अधिक असल्याचेही बोलले जात आहे. मात्र जंगलातील फळवगीय झाडांची संख्या वाढविण्यासाठी शासन स्तरावर प्रशासकीय यंत्रणेला पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
दारव्हा: जंगलांमध्ये फळझाड लागवड करण्याची गरज..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 11, 2022
Rating:
